मंडणगड पिंपळोली मशिदीत चोरी: २.४७ लाख रुपयांचे चांदीचे दागिने लंपास

रत्नागिरी: मंडणगड तालुक्यातील पिंपळोली येथील मशिदीत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे २ लाख ४७ हजार रुपयांचा चांदीचा ऐवज चोरून नेला आहे.

या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून, धार्मिक स्थळाला लक्ष्य केल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरी बुधवार, ८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ८:१५ वाजण्यापासून ते गुरुवार, ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजण्याच्या सुमारास घडली.

पिंपळोली मुस्लिम मोहल्ला येथील रहिवासी आणि गावाचे काझी हुसेन इब्राहीम पेटकर (वय ८७) यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अज्ञात चोरट्याने मशिदीतील पाण्याच्या टाकीच्या रूमचे कुलूप कशातरी धारदार हत्याराने तोडून आत प्रवेश केला.

त्यानंतर सागवानी बॉक्सचे कुलूप तोडून चांदीचे मौल्यवान दागिने आणि वस्तू चोरून नेल्या. चोरीस गेलेल्या मालात मशिदीवर लावण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे..

यामध्ये अंदाजे १.५ किलो वजनाचा १ लाख ५० हजार रुपये किमतीचा चांदीचा चाँद, ३०० ग्रॅम वजनाचे ४५ हजार रुपये किमतीचे चांदीचे गोंडे, २०० ग्रॅम वजनाचे ३० हजार रुपये किमतीचे निशाणावर लावण्याचे तीन चांदीचे गोंडे आणि २०० ग्रॅम वजनाचे २२ हजार रुपये किमतीचे तीन लहान चांदीचे चांद-तारे यांचा समावेश आहे. एकूण २ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या चोरीची तक्रार गुरुवार, ९ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११:०२ वाजता मंडणगड पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली. पोलिसांनी गु.आर.नं. ५४/२०२५ नुसार अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मंडणगड पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*