दापोली : देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दापोली तालुक्यातील जि. प. शाळा साखळोली क्र. १ येथील विद्यार्थ्यांनी ‘एक राखी जवानांसाठी’ या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या तब्बल ३२० राख्या जवानांसाठी पाठविल्या आहेत.
दापोली तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये गेल्या दोन दशकांहून अधिक काळ हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. गावतळे ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक तसेच आझाद हिंद ट्रस्ट कोल्हापूरचे प्रवर्तक संदिप वारके यांच्या पुढाकारातून हा उपक्रम सुरू आहे.
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, श्रमप्रतिष्ठा, संवेदनशीलता आणि देशसेवेची भावना रुजावी, या उद्देशाने कार्यानुभव विषयांतर्गत विद्यार्थ्यांकडून राख्या तयार करून त्या सीमेवरील जवानांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले जाते. गावतळे पंचक्रोशीसह दापोली तालुक्यातील विविध शाळांमधून संकलित झालेल्या राख्या आझाद हिंद ट्रस्टच्या माध्यमातून जवानांपर्यंत पोहोचविल्या जातात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून साखळोली क्र. १ शाळेतील विद्यार्थ्यांनी लोकरीपासून स्वतः तयार केलेल्या ३२० राख्या शाळेचे शिक्षक समीर ठसाळ व विद्यार्थ्यांच्या हस्ते संदिप वारके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.
विशेष म्हणजे, राख्यांसोबत विद्यार्थ्यांनी जवानांसाठी आपुलकीने पत्रेही लिहिली आहेत. ‘प्रिय सैनिक दादा…’ अशा प्रेमळ शब्दांनी सुरू होणाऱ्या या पत्रांमधून चिमुकल्यांनी सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता, प्रेम आणि आदर व्यक्त केला आहे.
शिक्षक संगिता लोहारे आणि समीर ठसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील चिमुकल्या हातांनी तयार केलेल्या राख्यांमधून देशसेवेची भावना आणि जवानांप्रती असलेली कृतज्ञता जपण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

