संगमेश्वर : दादर – रत्नागिरी पॅसेंजर (अप-डाऊन) आणि दिवा – सावंतवाडी पॅसेंजर (अप-डाऊन) दोनही पॅसेंजर गाड्या त्वरित सुरू कराव्यात अशी मागणी निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर या फेसबुक ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. 

दरवर्षी  होलिकोत्सव तसेच मे महिन्याच्या सुट्टीत कोकण रेल्वेने मुंबई-ठाणे येथून कोकणात जाणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी असते. यंदा मात्र करोना महामारीच्या कारणास्तव कोकण रेल्वेला खीळ बसली.

गेल्या काही दिवसांपासून काही गाड्या सुरू झाल्या असल्या तरी कोकणवासीय प्रवाशांना काही थांबे मिळालेले नाहीत. त्यामुळे अपरिहार्यपणे रस्ते मार्गावरून प्रवास सुरू आहे. हा प्रवास प्रचंड त्रासदायक, खर्चिक आणि खासगी गाड्यांच्या मनमानी पैसे उकळण्याच्या वृत्तीमुळे असह्य झालेला आहे.

पर्यटक आणि स्थानिक रहिवाशी सातत्याने कोकणात जात-येत असतात. कोकण रेल्वेला महसूलही मोठ्या प्रमाणावर मिळतो. याचा विचार शासनाकडून कधीच होत नाही.

रत्नागिरी पॅसेंजर आणि दिवा सावंतवाडी पॅसेंजर बाबतीतही प्रशासन गांभीर्याने पहात नाही. या दोनही गाड्या पूर्ण आरक्षण क्षमतेने तात्काळ सुरू कराव्यात अशीही मागणी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.

वारंवार रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार करावा लागत असल्यामुळे सर्व सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.