बिरसा फायटर्सची दापोली तहसिल कार्यालयात धडक

“कोण म्हणतो देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय !” घोषणा दणाणल्या

आम्हीही माणसंच आहोत,आमचा मरणाचा अधिकार हिरावू नका

सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांच्या नेतृत्वाखाली जामगे – विसापूर या गावातील बेंद्रेवाडी, कातकरवाडी, नवानगर कातकरवाडी व जामगे हद्दीतील कातकरवाडी या चार वाडीतील 60 लोकांनी, आदिवासी बांधवांनी स्मशानभूमीच्या मागणीसाठी तहसिल कार्यालय दापोलीत आज धडक मारली.

तहसीलदार वैशाली पाटील यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. तहसीलदार व ग्रामस्थ यांच्यात 15 मिनिटे चर्चा झाली. तहसीलदारांसमोर ग्रामस्थांनी आपली समस्या मांडली. हा विषय पंचायत समिती दापोली विभागाशी संबंधित असल्यामुळे गटविकास अधिकारी आर एम दिघे पंचायत समिती दापोली ,उपविभागीय जलसंधारण अधिकारी दापोली, जामगे व विसापूर गावाचे ग्रामसेवक व सरपंच यांना मी तात्काळ बोलावून या विषयाची माहिती देते व दुसर्‍या ठिकाणी किंवा जवळपासच्या गावात स्मशानभूमीची पर्यायी व्यवस्था करते. असे आश्वासन तहसीलदार दापोली वैशाली पाटील यांनी दिले.


“कोण म्हणतो देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय !”, आदिवासींना स्मशानभूमी मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे! अशा घोषणा तहसिल कार्यालयासमोर आदिवासीं बांधवांनी दिल्या. त्यामुळे तहसिल कार्यालय दापोली आदिवासींच्या घोषणांनी दणाणले.

आम्हीही माणसंच आहोत, आमचा मरणाचा हक्क हिरावून घेऊ नका. आम्हाला दुसर्‍या गावात स्मशानभूमी नको, आमच्या पूर्वीच्या जागीच म्हणजे आमच्या गावातच स्मशानभूमी हवी आहे.

आम्हाला पर्यायी ठिकाणी स्मशानभूमी नको, प्रशासनाने स्मशान शेड बांधण्यास परवानगी दिली नाही, तर आम्ही आता यापुढे कुणीही मयत झाले तर तहसिल कार्यालय दापोली येथे प्रेत आणून जाळणार आहोत. गावात धरण बांधू देणार नाहीत, अधिका-यांना दगडे मारू, असा पवित्रा जामगे येथील आदिवासी बांधवांनी दिला आहे. यावेळी जामगे विसापूर गावातील चार वाडीतील 60 पेक्षा अधिक लोक, महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जामगे विसापूर लघूपाटबंधारे योजनेत धरणाचे काम प्रगती पथावर असून धरणाच्या खालील बाजूस पुष्प कालव्याचे काम करण्यात येणार आहे, असे कारण देत उपविभागीय जलसंधारण उपविभाग, मृद व जलसंधारण उपविभाग दापोली यांनी दिनांक २२/११/२०२१ रोजीच्या पत्राद्वारे स्मशानशेड बांधण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे स्मशानशेड बांधण्यासाठी शासनाकडून मंजूर करण्यात आलेले अडीच लाख रुपये परत गेले. आता या गावातील लोकांनी प्रेत कुठे जाळायचे ? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जामगे विसापूर येथील चार वाडीतील आदिवासी बांधवांचा स्मशानभुमीची समस्या प्रशासनाने सोडवली नाही तर आम्ही बिरसा फायटर्स संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करणार आहोत, असा आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी तहसीलदार वैशाली पाटील यांच्या हातात दिले आहे.