सेना ठाकरे गटातून राजेंद्र महाडिक, विलास चाळकेंसह रोहन बनेंची हकालपट्टी

रत्नागिरी : राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले.

त्यामुळे रत्‍नागिरीत ठाकरे गटाला फटका बसला. यातच उद्धव ठाकरेंच्या आदेशाने रत्नागिरीतील ३ बड्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचं पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

शिवसेना सचिव माजी खासदार विनायक राऊत यांच्या सहीने हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

या पत्रात म्हटलंय की, रत्नागिरी जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, चिपळूण संगमेश्वर विधानसभा प्रमुख रोहन बने यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

हकालपट्टीचं पत्र

ही माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आल्याचं पत्रकातून कळवण्यात आले आहे.

विधानसभेत मिळालेल्या यशानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यास अनेक नेते उत्सुक आहेत. त्यात ठाकरे गटातील नेत्यांची मोठी संख्या आहेत. एकनाथ शिंदे आज रत्नागिरीत असून त्यांच्या नेतृत्वात सेनेचे २ माजी आमदार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, दापोलीतील उद्धव सेनेचे ५ माजी नगरसेवक, असंख्य पदाधिकारी शिंदेसेनेत प्रवेश करणार आहे. आजच्या कार्यक्रमात संगमेश्वरचे माजी आमदार सुभाष बने, राजापूरचे माजी आमदार गणपत कदम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात शिंदेसेना वाढावी यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. केवळ रत्नागिरीतच नव्हे तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ठाकरे गटाला खिंडार पाडण्याचा चंग एकनाथ शिंदेंनी बांधला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीही किरण सामंत यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी उद्धवसेनेला राजापूर, लांजा तालुक्यात खिंडार पाडले होते. किरण सामंत आमदार झाल्यानंतर त्यांनी पक्षवाढीची मोहीम हाती घेतली आहे. त्यात गावातील अनेक शाखाप्रमुख, विभागप्रमुख शिंदेसेनेत प्रवेश करत आहेत.

दत्ता कदम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रभारी जिल्हाप्रमुख

दत्ता कदम यांचं नियुक्ती पत्र

विलास चाळके यांच्या हकालपट्टी नंतर शिवसेना ( उबाठा ) गटाच्या दक्षिण जिल्हाध्यक्ष पदावर प्रभारी म्हणून शिवसैनिक दत्ता कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विलास चाळके यांची हकालपट्टी करण्यात आल्याच्या निर्णयानंतर अवघ्या काही कालावधीत माजी बांधकाम सभापती दत्ता कदम यांच्या खांद्यावर प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे.

दत्ता कदम, प्रभारी जिल्हाप्रमुख

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*