“आज जी काय भावंडा जमलेली हायत तशी येणारी आन न येणारी सारी दरवर्षी तुझी सेवा कराय येऊं देत. मोकली झालेली घरा पोराटोरानी भरून जाऊं देत. सारवलेल्या खळ्याना पूना पूना सारवाया लागल इतकी पोरा खेळायला एकत्र येऊन देत. मोकळ्या मळ्या भाताच्या रोपानी हिरव्या गार हौन्देत. सोंबाच्या डोंगरावर तुटणारी झाडा बंद हौंदेत. नद्येला बारा महिने पाणी व्हावू दे. नल आले म्हणून बंद विहिरी साफ व्होऊ देत. पोरा शिकू देत आणि इथच रहातील अस घडू दे आणि ज काय चुकलं माकलं असेल त माफ करून गावकी, भावकी सुखान एकत्र राहुंदे…”
सोमा नानाने कापऱ्या आवाजात गाऱ्हाणं घातलं आणि सारे घोगऱ्या आवाजात होय म्हाराजा म्हणाले. कपाळी केशरी गंध गणेशा तुझा मला छंद गजर सुरू झाला आणि समईच्या प्रकाशात पाट अलगद हलला. ओल्या डोळ्यात सारा भूतकाळ झिरपू लागला.
रात्रभर नाच, फुगड्या आणि जागरण तरीही आजची सकाळ लवकर उजाडत असे. आज मोठ्या माणसांची लगबग इतकी असे की आम्ही काय करतोय इकडे लक्ष नसे.
एक आठवडा नुसता धिंगाणा घातल्यावर संध्याकाळी शेवटच्या एस.टी.ने परत निघायचं म्हणजे पुन्हा लवकर भेट होणार नाही यामुळे सर्व भावंडं गप्प असायची.
पाच दिवस एक चैतन्य मूर्ती भोवती सारं घर केंद्रित झालेले असताना आज रात्री आपापल्या घरात परत जायचं या कल्पनेने बाहेर आणि प्रत्येकाच्या डोळ्यात अलगद सरी येत असायच्या.
कुणाला हे दिसू नये म्हणून की काय नेमकी वीज गायब व्हायची आणि कंदिलाच्या प्रकाशात आई पानाच्या द्रोणात शिधा बांधताना पदर डोळ्याला लावताना कोणाला दिसणार नाही याची काळजी घेऊनही लक्षात यायचं आणि बाबांचे श्लोक मोठ्या आवाजात सुरू व्हायचे.
काल गौरी आणताना घातलेली रांगोळी आज परतीच्या पावलाना आपली रेखीवता विसरून जायची. आत्माराम डोक्यावर पाट घ्यायचा आणि कपाळाला टिळा लावून सारे पुढच्या वर्षी लवकर या गजर सुरू करायचे.
विहिरी जवळ आरती करताना तो जोश नसायचा, हातात पाट घेऊन जगू विहिरीत उतरायचा आणि भरलेल्या विहिरीत तिसरी डुबकी आपल्या बरोबर सार काही रीत करून जायची.
भानावर आणायला कोणीतरी खोबरं घ्या रे म्हणत प्रसाद वाटायचा आणि रिकामा पाट देवघरात ठेवताना हात जड व्हायचे.
घर आवरून एस.टी. पकडायची म्हणून निघालेली पावलं वाटेवर ओळीत निघालेले बाप्पा आणि भरून वाहणारी नदी मातीशी पाय घट्ट बांधायची.
आजही म्हणूनच डांबरी रस्ते खुणावतात पण वाटेवर पोपटांचा थवा असणारे झाड आता गायब आहे.
मात्र कापऱ्या आवाजात पुढच्या वर्षी लवकर या हे ऐकायला घर बोलावत राहीलच .
– संतोष पुरोहित