सिंधुदुर्ग : केंद्र सरकारच्या नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड अर्थात राष्ट्रीय फलोद्यान मंडळाच्या सदस्यपदी ‘स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघ’ आणि अन्य कृषी उपक्रमांतून कार्यरत असलेले कृषी क्षेत्रातील अग्रणी संदीप यशवंत राणे यांची अशासकीय सभासद म्हणून निवड करण्यात आली आहे.
केंद्र सरकारकडून या मंडळावर तीन वर्षांकरिता १६ अशासकीय सभासदांची नेमणूक केली जाते, त्यानुसार संदीप राणे यांची या महत्त्वाच्या पदावर वर्णी लागली आहे.
राष्ट्रीय फलोद्यान मंडळामार्फत संपूर्ण देशातील फलोद्यान विषयक समस्या, त्यावरील उपाय आणि एकूणच व्यवस्थापन या संदर्भातील देशपातळीवरील निर्णय घेतले जातात. तसेच, शासनाच्या अनेक कृषी योजनांसह पाच हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील मोठ्या बजेटचे प्रकल्प या मंडळामार्फत राबविले जातात.
यात प्रामुख्याने प्रोसेसिंग युनिट आणि सूतगिरण्यांसारख्या मोठ्या प्रकल्पांना मूर्त स्वरूप देण्याचे काम या माध्यमातून होते. संदीप राणे यांनी यापूर्वी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार परिषद सदस्य म्हणून दोन वेळा, तर दापोली येथील वनशास्त्र महाविद्यालयाचे बोर्ड ऑफ स्टडी मेंबर म्हणून लक्षणीय काम केले आहे.
सध्या ते स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघ, विज्ञान भारतीचे सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक आणि विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा समितीचे राज्य संयोजक म्हणूनही कार्यरत आहेत. संदीप राणे यांच्या या केंद्रीय पातळीवरील निवडीमुळे संपूर्ण कोकणात आनंद व्यक्त केला जात आहे.

