एटीएममधून पैसे काढताना मोफत व्यवहारांची मर्याद संपल्यानंतर आकारण्यात येणाऱ्या शुल्काशी संबंधित नियमात रिझर्व्ह बँकेने बदल केला आहे. त्यामुळे एटीएममधून पैसे काढणे येत्या जानेवारीपासून किंचितसे महाग होणार आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की बँकांच्या इंटरचेंज शुल्कात वाढ झाली आहे. तसेच सामान्य खर्चही वाढला आहे, याची भरपाई करण्यासाठी बँका एटीएम व्यवहारावर आकारत असलेले शुल्क वाढवून २१ रुपये करणार आहे. ही वाढ १ जानेवारी २०२२ पासून लागू होईल. सध्या हे शुल्क २० रुपये आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले की, एटीएम स्थापनेचा खर्च वाढला आहे. तसेच एटीएमच्या देखभाल खर्चातही वाढ झाली आहे. त्यामुळे या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. जून २०१९ मध्ये रिझर्व्ह बँकेने एटीएम शुल्काच्या आढाव्यासाठी एक समिती स्थापन केली होती. इंडियन बँक्स असोसिएशनचे चेअरमन या समितीचे अध्यक्ष होते. या समितीच्या शिफारशींनुसार रिझर्व्ह बँकेने बँकाना एटीएमच्या शुल्कामध्ये वाढ करण्याची परवानगी दिली आहे. तो खर्च ग्राहकांना पडेल.
रिझर्व्ह बँकेने अलीकडेच बँकांच्या इंटरचेंज शुल्कात वाढ केली होती. वित्तीय व्यवहारांचे इंटरचेंज शुल्क १५ रुपयावरून १७ रुपये, तर बिगर-वित्तीय व्यवहाराचे इंटरचेंज शुल्क ५ रुपयावरून ६रुपये करण्यात आले आहे. १ ऑगस्ट २०२१ रोजी हे नवे दर लागू झाले. बँक ग्राहकाचे ज्या बँकेत खाते आहे, त्याच बँकेच्या एटीएममधून दर महिन्याला पाच वित्तीय व बिगर-वित्तीय व्यवहार मोफत करता येतात. त्याचवेळी इतर बँकांच्या एटीएमधून मेट्रो शहरात तीनवेळा आणि बिगर-मेट्रो शहरात पाचवेळा मोफत पैसे काढता येतात. त्यावरच्या व्यवहारांसाठी बँका शुल्क आकारू शकतात. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला आता अधिक झळ बसणार आहे.