दापोली : नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस कोणासोबत आघाडी करणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. पण या चर्चांना आता पूर्णविराम मिळालं आहे. दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस स्वबळावरच लढणार असल्याची माहिती, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी ‘माय कोकण’शी बोलताना दिली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच काँग्रेस सर्व निवडणुका स्वबळावर लढेल असं जाहीर केलं होतं. आमचे नेते जे म्हणतील त्या पद्धतीनेच आमची भूमिका राहील, असं अविनाश लाड म्हणालेत.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे दापोली मंडणगड विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी दापोली आणि मंडणगडमध्ये काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचे संकेत दिले होते. दापोली आणि मंडणगडमध्ये शिवसेना आणि काँग्रेसला निवडून द्या, असं आवाहन देखील त्यांनी जनतेला केलं होतं.

यावर आम्ही अविनाश लाड यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. तर ते म्हणाले की, “याबाबत आमच्याशी शिवसेनेने कोणतीही चर्चा केलेली नव्हती. चर्चे दरम्यान जिल्हाध्यक्ष होते का? त्यांच्याबरोबरच्या बैठकीमध्ये निरीक्षक होते का? अशा प्रकारचे प्रतीप्रश्न विचारत त्यांनी शिवसेनेसोबतच्या आघाडीच्या चर्चेबद्दल नकार दिला आहे. काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवेल, हे त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती उपलब्ध आहे. यावर ते म्हणाले की, “तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी ते प्रयत्न करणार आणि आमचा पक्ष वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. या निवडणुकीमध्ये आम्ही कोणाशीही आघाडी करणार नाही. तर सर्वच्या सर्व जागांवर आम्ही निवडणूक लढवणार,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

आता दापोली तालुक्यातील आणि मंडणगड मधील स्थानिक नेतृत्वला जिल्हाध्यक्षांचा निर्णय मान्य केल्याशिवाय पर्याय नाही, असं बोललं जात आहे.