रत्नागिरीच्या आकांक्षा कदम आणि पूर्वा किनरे यांना प्रतिष्ठेचा शिवछत्रपती पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : राज्य शासनाचा मानाचा समजला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार रत्नागिरीच्या कॅरमपटू आकांक्षा उदय कदम आणि योगापटू पूर्वा शिवराम किनरे यांना जाहीर झाला होता.

शुक्रवारी मुंबईत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन २०२२-२३ साठी पूर्वा किनरे तर २०२३-२४ साठी आकांक्षा कदम यांना हा पुरस्कार मिळाला. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी आकांक्षाला हा सन्मान मिळाला असून, तिच्या यशाचे रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्रातून कौतुक होत आहे.

पूर्वा किनरे हिने योगासन या क्रीडा प्रकारात जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पालीजवळच्या कशेळी या खेडेगावात राहणारी पूर्वा गेल्या १२ वर्षांपासून रत्नागिरी येथील राज्यातील पहिल्या शासकीय योगा क्रीडा केंद्रात प्रशिक्षण घेत आहे.

राज्यातील पहिले योग क्रीडा मार्गदर्शक रवीभूषण कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने अविरत मेहनत आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर यशाची उंची गाठली. योगासन या क्रीडा प्रकारासाठी प्रथमच हा पुरस्कार मिळाला असून, पूर्वाच्या यशाने तिची लहान बहीण प्राप्ती हिलाही प्रेरणा मिळाली आहे.

पूर्वाचे वडील, जे प्राथमिक शिक्षक आणि खो-खोचे पंच आहेत, यांनी दोन्ही मुलींना मोठे पाठबळ दिले. पनवेल येथील महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना पूर्वाने अभ्यासाबरोबरच योगासनातील साधना कायम ठेवली.

दुसरीकडे, आकांक्षा कदम हिने कॅरम या खेळात आपली छाप पाडली आहे. तिच्या यशामुळे रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. योगासन आणि कॅरम या दोन्ही खेळांना या पुरस्कारामुळे नवीन प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा आहे. राष्ट्रीय स्पर्धांमुळे योगासन या पारंपरिक खेळाला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे.

पूर्वाने सांगितले की, “१२ वर्षांची मेहनत आता पदकाच्या रूपाने यशस्वी ठरली आहे. युवा खेळाडूंना आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी योगासन हे सर्वोत्तम व्यासपीठ ठरत आहे.”

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*