लांजा : तालुक्यातील वेरवली रामगाव, लाडवाडी येथे राहणाऱ्या एका ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेचा खून करून तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना १९ ऑक्टोबर २०२६ रोजी घडली होती.
या गंभीर गुन्ह्याचा रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक माहितीच्या आधारे अवघ्या १२ तासांत छडा लावत एकाला अटक केली आहे.
सोमवारी सकाळी साडेदहा ते साडेअकराच्या सुमारास संबंधित पीडित महिला घरात एकटीच असताना अज्ञात व्यक्तीने तिचा खून केला. त्यानंतर तिच्या हातातील सोन्याच्या दोन बांगड्या व दोन पाटल्या जबरदस्तीने काढून घेत तिच्या हातात नकली बांगड्या घातल्याचे तपासात उघड झाले.
याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ३०९(४) व ३३२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाची दिशा निश्चित केली.
गुन्ह्याची लवकरात लवकर उकल करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, लांजाचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे आणि राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या समन्वयाने तीन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली.
या पथकांनी समांतर तपास करत घटनास्थळापासून दीड किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या प्रमोद प्रकाश खेडेकर (रा. वेरवली खुर्द, कातळवाडी, ता. लांजा) याला ताब्यात घेतले. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने हा गुन्हा केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली देवकन्या मैदाड, संदीप ओगले, अमोद सरंगले, प्रशांत बोरकर, सचिन भुजबळराव, विजय आंबेकर, नितेश राणे, गणेश सावंत, प्रियांका कांबळे, योगेश नार्वेकर, प्रतीक्षा राणे, भैरवनाथ सवाईराम, संजय मारळकर, दत्ता कांबळे व अतुल कांबळे या अधिकारी आणि अंमलदारांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.

