दापोली: शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे असून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत आई-वडिलांपेक्षाही गुरुची भूमिका अधिक प्रभावी असते, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई यांनी केले.
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा दापोलीच्या वतीने आयोजित ८७ गुणवंत विद्यार्थी, शाळा, कार्यरत शिक्षक, सेवानिवृत्त आणि नवनियुक्त शिक्षकांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी त्यांनी जिल्हा परिषद शाळा खाजगी शाळांपेक्षा उत्कृष्ट कामगिरी करत असल्याचे सांगून शाळांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले.
पंचायत समिती उपसभापती नम्रता तोडणकर यांनीही जिल्हा परिषद शाळांच्या कार्याचे कौतुक करत पालकांनी पाल्यांकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात प्रवीण काटकर यांनी शिक्षकांच्या विविध अडचणी सोडवतानाच समाजभान राखून अखिल शिक्षक संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याचे स्पष्ट केले.
या सोहळ्याला जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर गोलांबडे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र फणसे, संदीप चिखले, श्रीराम इदाते, नरेश घरटकर यांच्यासह शिक्षण विस्तार अधिकारी बळीराम राठोड, अनिल सुकाळे, गणेश पवार, सर्व केंद्रप्रमुख आणि ४०० हून अधिक शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगिनींनी सुस्वर स्वागतगीत सादर केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना रोख रक्कम व भेटवस्तू देऊन, तसेच शिक्षक आणि शाळांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष विजय फंड यांनी केले, तर सूत्रसंचालन वैभव बोरकर आणि अनुराधा देसाई यांनी केले.
हा गुणगौरव सोहळा यशस्वी करण्यासाठी अखिल शिक्षक संघटनेच्या संपूर्ण परिवाराने विशेष मेहनत घेतली.

