रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ३० सप्टेंबर २०२६ अखेर तब्बल ६ हजार कोटी रुपयांचा एकूण व्यवसाय पूर्ण करून बँकिंग क्षेत्रात महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
या कालावधीत बँकेला ४९ कोटी १३ लाख ३६ हजार रुपयांचा नफा झाला असून, गतवर्षीच्या सप्टेंबरअखेरच्या तुलनेत यंदा नफ्यामध्ये लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे.
ग्राहकांचा बँकेवरील दृढ विश्वास आणि बँकेने पुरवलेल्या उत्कृष्ट सेवांच्या जोरावर ही मोठी व्यवसायवाढ साधणे शक्य झाले आहे.
बँकेने सध्या एनईएफटी (NEFT), आरटीजीएस (RTGS), एटीएम (ATM) आणि मोबाईल बँकिंग यांसारख्या अत्याधुनिक डिजिटल सुविधांवर मोठा भर दिला असून लवकरच एईपीएस (AEPS) सुविधेचा विस्तार करण्याचेही बँकेचे नियोजन आहे.
ठेवी, कर्जवाटप आणि नफ्यामध्ये झालेल्या या घसघशीत वाढीबद्दल बँकेचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, संचालक मंडळ तसेच सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.
सर्वांच्या एकत्रित सहकार्यामुळेच बँकेला हे मोठे यश मिळाल्याची प्रतिक्रिया बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर गिम्हवणकर यांनी व्यक्त केली आहे.


