दापोली : शहरातील मच्छी मार्केटसमोरील सावंत बिल्डिंग रस्त्यावर बलेनो कारची काच फोडून तिघांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून इतर चार जणांचा शोध सुरू आहे.
विरार येथील रहिवासी दीपक दत्ताराम शेडगे (४०) हे त्यांचे चुलत भाऊ प्रवीण प्रताप जेधे आणि स्वप्निल मारुती शेडगे यांच्यासह दापोलीत आले होते.
१५ मे रोजी सायंकाळी १२.४५ वाजण्याच्या सुमारास आरोपी आर्कोदी अहमद जोगिलकर, अझर अहमद जोगिलकर, अकलाक अल्लाउद्दीन आलम आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर चार जणांनी मिळून दीपक शेडगे यांच्या बलेनो कारवर दगडफेक केली. या दगडफेकीत कारची काच फुटून नुकसान झाले.
त्यानंतर आफ्रिदी जोगिलकर याने दीपक शेडगे यांच्या डोक्यात काचेची बाटली मारली. तसेच इतर आरोपींनी दीपक शेडगे, प्रवीण जेधे आणि स्वप्निल शेडगे यांना लाथाबुक्क्यांनी आणि हाताने बेदम मारहाण केली.
आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकीही दिली. या हल्ल्यात तिघेही जखमी झाले आहेत.
या घटनेप्रकरणी दीपक शेडगे यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ (BNS) च्या कलम ११८(२), १८९(१), १८९(२), १९१(२), ३२४(३), ११५(२), ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा (गु.र.नं. ९९/२०२६) दाखल केला आहे.
पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी आर्कोदी अहमद जोगिलकर आणि अकलाक अल्लाउद्दीन आलम यांना १५ मे रोजी रात्री २२.०७ वाजता अटक केली आहे. पोलीस या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

