रत्नागिरी : कारागृह हे केवळ शिक्षा भोगण्याचे ठिकाण नसून व्यक्तीच्या आयुष्यातील नव्या सुरुवातीचे केंद्र असावे, या विश्वासातून फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत कार्यरत मुकुल माधव फाउंडेशनतर्फे रत्नागिरी जिल्हा कारागृहात कैद्यांसाठी ८० दिवसीय प्लंबिंग कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
मुकुल माधव फाउंडेशन, फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड, रत्नागिरी कारागृह प्रशासन आणि जन शिक्षण संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत कैद्यांना प्लंबिंग क्षेत्रातील व्यावहारिक आणि तांत्रिक ज्ञान दिले जाणार असून, प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या कैद्यांना ‘स्किल इंडिया’चे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
कारागृहातून मुक्त झाल्यानंतर कैद्यांना समाजात सन्मानाने जगता यावे तसेच त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
मुकुल माधव फाउंडेशनच्या संस्थापक रितू छाब्रिया यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वीही पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृह, सातारा जिल्हा कारागृह तसेच राजस्थान आणि गुजरातमधील विविध कारागृहांमध्ये शिक्षण, कौशल्य विकास आणि पुनर्वसनाचे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत.
कारागृहांना केवळ बंदिस्त जागा न मानता पुनर्वसन आणि सकारात्मक परिवर्तनाची केंद्रे बनविण्याचा फाउंडेशनचा प्रयत्न आहे.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशनचे प्रतिनिधित्व श्रीदत्त अलबुर, नंदकिशोर शिंपी, सागर चिवटे, आशिष आठवले, शामराव निंबाळकर आणि वरद गोरे यांनी केले.
तसेच रत्नागिरी जिल्हा कारागृहाचे जेलर सचिन पाटील, जन शिक्षण संस्थानच्या निधी सावंत, अमृता शेट्ये, सान्वी कदम, प्रशिक्षक भिकाजी नाटेकर यांच्यासह कारागृहातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
समाजाच्या मुख्य प्रवाहात पुनर्स्थापित होण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि स्वावलंबनाची भावना विकसित करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
शिक्षा ही शेवट नसून नव्या आयुष्याची सुरुवात आहे आणि कौशल्य विकास हे त्या नव्या प्रवासाचे सक्षम साधन आहे, असा विश्वास मुकुल माधव फाउंडेशनच्या संस्थापक आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक रितू छाब्रिया यांनी व्यक्त केला.

