
दापोली : येथील ए.जी. हायस्कूलचे कर्मचारी परशुराम सोनू करडे ३९ वर्षे आणि ४ महिन्यांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत.
दापोली शिक्षण संस्थेच्या या विद्यालयात त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने आपली सेवा बजावली.
त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शालेय समितीचे अध्यक्ष रवींद्र कालेकर यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष सदिच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
परशुराम करडे यांचे कार्य केवळ शालेय भिंतींपुरते मर्यादित नव्हते. त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांतही मोलाचे योगदान दिले आहे.
दापोली शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष, ब्राह्मण हितवर्धिनी पतपेढीचे संचालक, ए.जी. पतपेढीचे व्हाईस चेअरमन, गिम्हवणे भैरी देवस्थानचे सचिव आणि ग्रामपंचायत सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पेलल्या.
याशिवाय महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर संघटनेचे प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
या निरोप समारंभात रवींद्र कालेकर यांच्या हस्ते करडे यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
त्यांच्या पत्नी प्रतीक्षा करडे यांचाही संस्थेच्या संचालिका स्मिता सुर्वे यांनी सत्कार केला.
यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी करडे यांच्या कामातील शिस्त, जबाबदारी आणि सेवाभावाचे कौतुक केले. स्मिता सुर्वे यांनी आपल्या मनोगतात करडे यांच्या निष्ठेचा उल्लेख करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात कालेकर यांनी करडे यांचा स्वभाव साधा आणि मनमिळाऊ असल्याचे सांगत, त्यांनी संस्थेच्या प्रगतीत दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली.
या सोहळ्याला अर्जुन घुले, अनिल पेटकर, एस. आय. मगदूम, मानसी अभ्यंकर, शरद कांबळे, राजेंद्र हांडे, संध्या मालप, श्रेया भावे यांच्यासह अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र हांडे यांनी केले, सूत्रसंचालन संध्या मालप यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रेया भावे यांनी केले.

Leave a Reply