‘नो कॉम्प्रोमाईझ! रत्नागिरीला अमली पदार्थमुक्त करा’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा कडक इशारा

रत्नागिरी: “अमली पदार्थांचा विळखा रत्नागिरीतून कायमचा हद्दपार करायचा आहे. यात कोणतीही तडजोड चालणार नाही!” असा थेट आणि कठोर इशारा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिला आहे.

अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाईची मोहीम हाती घ्यावी, कोणाचाही फोन आला तरी त्याची नोंद ठेवावी आणि कठोर पावले उचलावीत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. प्रसारमाध्यमांनीही या सामाजिक लढ्यात पोलिसांना साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात अमली पदार्थविरोधी कारवाई, नियंत्रण आणि जनजागृतीसाठी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

“अमली पदार्थांचा थेट फटका आपल्या युवा पिढीला बसतोय. गावागावांतून तरुण मृत्यूच्या दाढेत लोटले जाताहेत. ही वेदना प्रत्येक गावाची आहे,” असे सांगत डॉ. सामंत यांनी संताप व्यक्त केला.

“पोलीस चांगले काम करताहेत, पण आता ही लढाई सामाजिक मोहीम बनली पाहिजे. प्रसारमाध्यमांनी पोलिसांना बळ द्यावे. वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत टोळ्यांवर तडीपारीची कठोर कारवाई करा. यात कोणताही धर्म किंवा जात पाहिली जाणार नाही. गुन्हेगार हा गुन्हेगारच!” असे त्यांनी ठणकावले.

“आपला रत्नागिरी जिल्हा अमली पदार्थमुक्त करायचाय. ही मोहीम इतक्या ताकदीने राबवा की रत्नागिरी पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात गाजेल,” असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

“अमली पदार्थ विकणारा आणि सेवन करणारा, दोघेही सारखेच दोषी! दोघांवरही कठोर कारवाई होईल. विद्यार्थ्यांनी, तरुणांनी या व्यसनापासून दूर राहावे. कोणाला काही माहिती असेल, तर पोलिसांना गोपनीयरित्या कळवा, त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल,” असे आवाहनही त्यांनी केले.

“अमली पदार्थांचे हे लोण कधीतरी आपल्या घरापर्यंत पोहोचेल, हे भान सर्वांनी ठेवावे. यात कोणतीही ढिलाई चालणार नाही.

गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्यांचे फोन आले, तर पोलिसांनी धाडस दाखवावे, त्यांची नोंद ठेवावी आणि त्यांची नावे प्रसारमाध्यमांना द्यावीत.

पोलीसांनी ठरवले तर काय होऊ शकते, हे या मोहिमेत दाखवून द्या!” असे कडक शब्दांत पालकमंत्र्यांनी सांगितले.

31 गुन्ह्यांत 50 गुन्हेगार जेरबंद, 7 तडीपार

पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी कारवाईचा तपशील दिला. 2024 मध्ये 25 गुन्ह्यांत 39 आरोपींना अटक झाली. यात 7.15 लाख किमतीचे 231 ग्रॅम ब्राऊन हेरॉईन, 6.66 लाख किमतीचा 32.858 किलो गांजा आणि 50.89 लाख किमतीचे 12.720 किलो चरस जप्त केले. 2025 मध्ये 6 गुन्ह्यांत 11 जणांना अटक झाली असून, 2.26 लाख किमतीचे 25.4 ग्रॅम ब्राऊन हेरॉईन आणि 3.76 लाख किमतीचा 7.616 किलो गांजा जप्त करण्यात आला. 7 सराईतांना जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात आले आहे.

क्षेत्रीय स्तरावरील पोलीस अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले.

“ही लढाई आता जनआंदोलन बनली पाहिजे. अमली पदार्थांच्या विरोधात रत्नागिरी एकजुटीने लढेल!” असे पालकमंत्री डॉ. सामंत यांनी शेवटी ठणकावले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*