दापोली : राज्यात युवा, विद्यार्थी, शेतकरी, बेरोजगार, महिला सुरक्षा, कामगार, अंगणवाडी सेविका असे सर्वच घटक हे त्रस्त असून या सर्व घटकांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. कापूस, सोयाबीन, कांदा, तूर तसेच आंबा आणि काजू या शेतमालाला भाव नाही, अतिवृष्टीमुळे किंवा दुष्काळामुळे पिकाचं नुकसान होऊनही विम्याची नुकसानभरपाई मिळत नाही.

कोकणातील मच्छिमारी व्यवसाय अनेक मोठ्या अडचणित आहे. यासारख्या समस्या सोडवून जनतेच्या मागण्या पूर्ण कराव्यात, असे निवेदन दापोली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने तहसीलदारांना देण्यात आले.

यावेळी निवेदन देताना त्यावेळी तालुकाध्यक्ष सचिन तोडणकर, जिल्हा प्रवक्ते माधव शेट्ये, महिला उपाध्यक्ष प्रदेश कार्यकारणी सुजाता तांबे, शहराध्यक्ष ॲड. खलील डिमडीमकर, दिलीप कासारे, जिल्हा उपाध्यक्ष काका पवार, तालुका उपाध्यक्ष सईद कोंडेकर,
कार्याध्यक्ष अल्पसंख्यांक अबुद्दीन बर्डे, सोनाली
अडविलकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही दिवसेंदिवस बिकट बनत चालला आहे. अनेक दिवस कडाक्याच्या थंडीत आंदोलन करुनही अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या आंदोलनाकडं सरकार ढुंकूनही बघत नाही.

दरवर्षी लाखो युवा शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत, पण त्यांच्या हाताला काम मिळत नाही. युवा हा आपल्या देशाचा कणा आणि भविष्य असून एकूण लोकसंख्येमध्ये त्याचं प्रमाण ६० टक्के आहे.

तरीही त्यांच्या प्रश्नांकडे सरकार लक्ष देत नाही. राज्यात ३२ लाख युवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत असून परीक्षा फी, पेपरफुटी, रखडलेली अडीच लाख रिक्त पदांची भरती है प्रश्नही सुटलेले नाहीत, या सर्व प्रश्नांकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.