
रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना आणि उदय सामंत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत ७२ व्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १ आणि २ मे २०२६ रोजी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कै. श्रीराम हरी खालू नाट्य मंदिर आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे पार पडणार आहे.
या स्पर्धेला भारतीय स्वास्थ्य आणि शरीरसौष्ठव महासंघ (IFBF) आणि महाराष्ट्र राज्य हौशी शरीरसौष्ठव संघटनेची मान्यता आहे. स्पर्धेत भारत श्री, भारत किशोर, भारत कुमार, भारत उदय, भारत श्रीमान, मेन फिजिक्स, क्लासिक फिजिक्स आणि जिम मॉडेल अशा एकूण ८ गटांत चुरस पाहायला मिळेल. यातील ४ स्पर्धा १ मे रोजी, तर उर्वरित ४ स्पर्धा २ मे रोजी होतील. तसेच या काळात राष्ट्रीय पंच परीक्षाही घेतली जाणार आहे.
संपूर्ण भारतातून सुमारे २५० स्पर्धक आणि १०० पदाधिकारी असे एकूण ३५० जण या स्पर्धेसाठी रत्नागिरीत दाखल होणार आहेत. स्पर्धेतील १० टायटल विजेत्यांना भव्य ट्रॉफी, मानाचा पट्टा, पदक आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात येईल. प्रत्येक गटातील पहिल्या सहा क्रमांकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाणार असून, विशिष्ट गटांतील पहिल्या तीन विजेत्यांना रोख पारितोषिके मिळतील.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेसाठी खेळाडू, पंच आणि प्रशिक्षकांची निवास, भोजन आणि वाहतुकीची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेचे उद्घाटन १ मे रोजी सायंकाळी ५ वाजता उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत होईल, तर बक्षीस वितरण २ मे रोजी रात्री १० वाजता पार पडेल.
स्पर्धेच्या नियोजनासाठी विरेंद्र वणजू (स्पर्धा प्रमुख), सदानंद जोशी (अध्यक्ष), जितेंद्र नाचणकर (कार्यवाह) यांच्यासह संतोष कदम, फैयाज खतीब, शैलेश जाधव, नरेंद्र वणजू आणि किशोर पाटील यांची समिती कार्यरत आहे. रत्नागिरीतील सर्व क्रीडाप्रेमींनी या राष्ट्रीय स्पर्धेला उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवावा, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply