दापोली: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार दापोली येथे बुधवारी, १ जून २०२६ रोजी कृषी दिन आणि डॉक्टर दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

समाजाचा कणा असलेल्या बळीराजाचे आणि आरोग्याचे रक्षण करणाऱ्या डॉक्टरांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी दापोली परिसरातील अनेक शेतकरी बांधवांचा आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या डॉक्टरांचा यथोचित सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता जगाचा पोशिंदा म्हणून राबणारा शेतकरी आणि संकटाच्या काळात देवदूत बनून धावून येणारा डॉक्टर या दोन्ही घटकांप्रती समाजाची असलेली बांधिलकी जपत मनसेने हा सामाजिक उपक्रम राबवला.

या महत्त्वपूर्ण सत्कार समारंभाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हासचिव तथा नगरसेवक सचिन गायकवाड, तालुकाध्यक्ष नितीन साठे, सुयोग देसाई आणि नदिम पठाण यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

समाजातील या अत्यंत महत्त्वाच्या घटकांचा सन्मान केल्याने उपस्थित शेतकरी आणि डॉक्टरांनी समाधान व्यक्त केले असून, दापोली तालुक्यात या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.