रत्नागिरी जिल्ह्यातील ता. मंडणगड येथील मंडणगड किल्ल्यावर वर्षोनुवर्षे दगड व झाडी झुडपात लुप्त झालेला “मुख्य प्रवेशद्वार” अखेरीस प्रकाशात आला. सह्याद्री प्रतिष्ठान मंडणगड विभागातील सदस्यांनी गडाच्या दि.१० जुलै २०२२ रोजी अभ्यास मोहिमेदरम्यान गडाच्या पूर्वेकडील बाजूस घडीव कोरीव दगड आणि दरवाजाची तुटलेली कमानीचे खांब त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्याची पाहणी करून ते दगड बाजूला केले असता.

गडाचा मुख्य प्रवेशद्वार आणि जांभ्या दगडात बांधलेली पहारेकऱ्यांची देवडी निदर्शनास आली. हा गडाचा मुख्य प्रवेशद्वार असून या ठिकाणी राजमार्ग ही आहे. साधारण ८ फूट लांब आणि ४ फूट उंच प्रवेशद्वार असून त्याचा घेरा/देवड्याचा परिसर २१ X २१ फूट लांब ११ फूट रुंद एवढं आहे. प्रवेशद्वारापासून खाली ९० फूट एवढा राजमार्ग परिसर असून त्यावर ढासलेल्या तटबंदीचे चिरे पडले आहेत.

मुख्य प्रवेशद्वार नकाशा


सध्या गडावर आपण प्रवेश करतो तो डांबरी रस्ता गडाचा पूर्वीचामुख्य मार्ग नसून त्याच्या खालच्या बाजूला मुख्य राजमार्ग आहे. या मार्गाने (प्रवेशद्वाराने) प्रवेश केल्यावर थेट गणेश मंदिराच्या दिशेला बाहेर पडतो.
गडावरील या मुख्यप्रवेशद्वार उजेडात आल्यामुळे आज गडाची आणखी एक महत्वाची दुर्गवास्तू शिवप्रेमींना पाहता येईल. या प्रवेशद्वार संवर्धनाची जबाबदारी सह्याद्रि प्रतिष्ठान मंडणगड विभाग घेत आहे. असे मत संस्थेचे मंडणगड विभाग प्रमुख श्री राहुल खांबे यांनी व्यक्त केले.

दगडात गाडलेला मुख्य प्रवेशद्वार

सदर अभ्यास मोहिमेत गडाचा पूर्ण परिसर अभ्यासून पुढील संवर्धन कार्याची दिशा ठरविण्या आली. या मोहिमेत योगेश निवाते, ललितेश दवटे, अमित महाडिक, अमोल भुवड, अमित भुवड, सोमेश बुरुनकर, सुयोग मयेकर, सिद्धेश जाधव, सागर पाटील आणि गणेश रघुवीर हे संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

संवर्धन कार्य

सह्याद्री प्रतिष्ठान हि संस्था महाराष्ट्रातील दुर्ग संवर्धन कार्य करत आहे. मंडणगडावर असलेल्या तोफेला लोकवर्गणीतून सागवानी तोफगाडा बसविण्यात आला. तसेच गडावरील धान्य कोठार आणि घरांच्या जोत्याचे अवशेष स्वच्छत करण्यात आली. गडावर सूचना फलक दिशा दर्शक लावण्यात आले.अश्या पद्धतीचे संवर्धनाची कामे सध्या संस्थे मार्फत सुरु आहेत.

दगडी बाजू केल्यानंतर

गडाचा इतिहास


मंडणगड किल्ल्याचा काही ठिकाणी उल्लेख मदगड, मतगड असा आढळतो. मंडणगड किल्ला हा इ.स.पूर्व काळापासून अस्तित्वात होता. तंजावरच्या शिलालेखाप्रमाणे शिवाजी महारजांनी मंडणगड हा किल्ला नव्याने बांधला असा उल्लेख आढळतो.

शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यावर असल्याने हेरांकडून कळताच सलाबतखानाने पन्हाळ्याच्या किल्ल्यास वेढा दिला. यावेळी सलाबतखानास इंग्रज सिद्दी आणि सावंतवाडीचे सावंत व पालवणीचे दळवी यांनी मदत केली. यशवंतराव दळवी सलाबतखानाच्या बाजूने शिवाजीराजाविरोधात लढला.शिवाजी राजांनी तहाचा देखावा करत सलाबतखानास गाफील ठेवले आणि दि.१३ जुलै १६६० रोजी  एक हजारांची फौज घेऊन शत्रूच्या चौक्यापाहारे चुकवत पन्हाळ्यावरून निसटून विशाळगडाकडे गेले.त्यांतर उंबरखिंडीच्या लढाई नंतर करतलबखान ३ फेब्रुवारी १६६१ रोजी राजांना शरण आला. फेब्रुवारी १६६१ मध्ये रजनी निजामपूर लुटून पालवणीवर आक्रमण केले.

पालवणीचा राजा यशवंतराव दळवी पळून प्रभावालीचा राजा सूर्यराव सुर्वे याच्याकडे शृंगारपूरला पळून गेला. दि.२९ एप्रिल १६६१ रोजी शृंगारपुरवर शिवाजी महारजांनी हल्ला केला.सूर्यराव सुर्वे याची शृंगारपुरची राजधानी ताब्यात घेतली. यावेळी शिवाजी महारजांनी मंडणगड आणि पालगड हे नवे किल्ले बांधले.
इ.स.१७१३ मध्ये हा किल्ला सिद्दी कडून कान्होजी आंग्रे यांनी आपली ताब्यात घेतला.


पुन्हा १७२६ मध्ये सिद्दीच्या ताब्यात गेला पुनः हा किल्ला मराठ्यांनी हस्तगत केला.इ.स.१७५५ मध्ये आंग्रे कडून हा किल्ला इंग्रजांनी घेतला परंतु पेशवा बालाजी बाजीराव (नानासाहेब) यांच्याशी झालेल्या ठरवा नुसार विजयदुर्ग बरोबर हा किल्ला मराठ्यांना सोपविण्यात आला. इ.स.१८१८ मध्ये कर्नल कॅनेडीने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला.