दापोली : मुंबई दादर येथे  दापोलीतील मुंबईवासिय शिवसैनिकांना संबोधित करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते  दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी हे तब्बल ७ वर्षानंतर एकत्र आले. उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी एकसंघ उभे राहण्याचा निर्धार यावेळी शिवसैनिकांनी केला. मोठ्या संख्येनं मुंबईकर या निर्धार मेळाव्यात उपस्थित होते.‌‌‍

दादरच्या छबीलदास शाळेच्या इमारतीमध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते अनंत गीते व माजी आमदार सूर्यकांत दळवी उपस्थित होते.

२०१४ मध्ये माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचा दापोली विधानसभा मतदार संघामध्ये झालेल्या पराभवांनंतर माजी मंत्री अनंत गीते व सूर्यकांत दळवी हे एका व्यासपीठावर आलेच नव्हते.

त्यानंतर २०१७ मध्ये विद्यमान आमदार योगेश कदम यांचा दापोली विधानसभा मतदार संघामध्ये वावर वाढल्याने गीते हे अनेक वेळा योगेश कदम यांच्या समवेत व्यासपिठावर दिसत होते. या काळात दापोली विधानसभा मतदार संघामधील शिवसेनेची सूत्रे योगेश कदम यांच्याकडे होती. त्यामुळे शिवसेनेच्या जाहीर कार्यक्रमांना माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना निमंत्रण नव्हते.

पण काही महिन्यापूर्वी झालेल्या मंडणगड व दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकामध्ये तिकीट वाटपाची जबाबदारी सुर्यकांत दळवी यांच्याकडे देण्यात आली होती. तसेच मंडणगड व दापोली मधील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा बदल देखील करण्यात आला होता.

त्यानंतर शिवसेनेतील बंडावेळी मातोश्रीने वेळोवेळी माजी आमदार सुर्य दळवी यांना सोबत घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. नुकत्याच झालेल्या शिवसेनेतील उठावानंतर माजी मंत्री अनंत गीते यांनी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेची पडझड होऊ न देण्याची भूमिका घेतली असून रायगड जिल्ह्यामध्ये झालेल्या मेळाव्यानंतर त्यांनी लोटे येथे देखील मेळावा घेऊन शिवसैनिकांना मार्गदर्शन केले होते.

आता दापोली विधानसभा मतदार संघातील मुंबईवासिय पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी राहण्याचा संदेश माजी मंत्री अनंत गीते व सुर्यकांत दळवी यांनी दिला आहे.