दापोली : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज संध्याकाळच्या वेळेत वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या समस्येमुळे विद्यार्थी, व्यावसायिक, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, लोकजीवनावर याचा गंभीर परिणाम झाला आहे.
संध्याकाळच्या वेळेत अचानक वीज खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान होत आहे, तर व्यापारी वर्गाला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
अनेक भागांमध्ये दररोज तासनतास वीज गुल होत असल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामांचा खोळंबा होत आहे. या गंभीर समस्येबाबत महावितरणकडे अनेकदा तक्रारी करूनही परिस्थितीत कोणतीही अपेक्षित सुधारणा झालेली नाही, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर दापोलीतील शिवसेनेचे युवा कार्यकर्ते स्वरूप महाजन यांनी महावितरणच्या ढिसाळ कार्यपद्धतीविरोधात आक्रमक भूमिका घेत अनोखं आंदोलन सुरू केलं आहे.
महाजन यांनी या समस्येची गंभीर दखल घेत महावितरण कार्यालयातच चटई टाकून झोपून आंदोलन करण्याचा अनोखा निर्णय घेतला आहे.
जोपर्यंत दापोली तालुक्यातील वीज पुरवठा पूर्णपणे सुरळीत होत नाही आणि वारंवार खंडित होणाऱ्या विजेवर प्रशासन ठोस उपाययोजना करत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
महाजन यांनी महावितरण प्रशासनाला तातडीने दुरुस्तीची कामे करण्याचे आवाहन केले असून, नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये असा इशाराही दिला आहे.
दरम्यान, स्वरूप महाजन यांच्या या भूमिकेला दापोलीतील अनेक नागरिकांनी आणि संघटनांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
तालुक्यात वाढत्या वीज समस्येच्या पार्श्वभूमीवर आता महावितरण प्रशासन यावर तोडगा काढून परिस्थिती सुधारते का, याकडे संपूर्ण दापोलीकरांचे लक्ष लागले आहे.

