दापोली : येथे सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी कार्यात सातत्याने अग्रेसर असलेल्या लायन्स क्लबच्या वतीने राष्ट्रीय शेतकरी दिन, डॉक्टर्स डे आणि चार्टर्ड अकाउंटंट डे निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे नेतृत्व क्लबचे अध्यक्ष गुरुप्रसाद बेर्डे यांनी केले. यावेळी माजी अध्यक्ष अतुल मेहता, सचिव आशिष अमृते, सदस्यत्व प्रमुख प्रसाद मेहता, सेवा प्रमुख आशिष मेहता, समीर कदम, केतन वनकर तसेच संचालक मनोहर जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सन्मानित शेतकऱ्यांमध्ये धोडू गणपत रेवाळे, बसंती बाळकृष्ण चौगुले, प्रमिता प्रकाश राजपुरे आणि साक्षी संतोष मांडवकर यांचा समावेश होता.
या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या कार्यातून कृषी क्षेत्रात आदर्श निर्माण केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच समाजाच्या आरोग्यसेवेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे कुणाल मेहता आणि पशुधन विकास अधिकारी लोंढे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
याशिवाय आर्थिक, कर व वित्तीय सल्लागार म्हणून उल्लेखनीय कार्य करणारे चार्टर्ड अकाउंटंट ऋषिकेश शेठ आणि कोचरेकर यांचाही शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शेतकरी, डॉक्टर आणि चार्टर्ड अकाउंटंट हे समाजाच्या विकासाचे तीन महत्त्वाचे आधारस्तंभ असल्याचे सांगितले.
त्यांच्या निस्वार्थ कार्यामुळे समाजाची प्रगती आणि विकास साध्य होत असून त्यांच्या कार्याचा सन्मान करणे ही समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमास दापोली लायन्स क्लबचे पदाधिकारी, सदस्य तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी सत्कारमूर्तींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

