दापोली : येथील रामराजे कॉलेजमध्ये लायन्स क्लब दापोली व माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आरोग्य व मासिक पाळी स्वच्छता जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत प्रोजेक्ट बालाच्या माध्यमातून रामराजे कॉलेजमधील २२५ विद्यार्थिनींना पुनर्वापर करता येणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनचे मोफत वाटप करण्यात आले.

अंदाजे २२० रुपये प्रति नग किंमत असलेल्या या नॅपकिनच्या माध्यमातून मासिक पाळीच्या काळात स्वच्छता राखणे, आरोग्यदायी सवयी अंगीकारणे आणि याविषयक गैरसमज दूर करणे हा यामागचा प्रमुख उद्देश होता.

रामराजे कॉलेज विद्यार्थिनींच्या शिक्षणासोबतच त्यांच्या आरोग्याची, सुरक्षिततेची आणि सर्वांगीण विकासाची विशेष काळजी घेत असून, विद्यार्थिनींना कोणताही संकोच न बाळगता आपल्या समस्या मांडता याव्यात यासाठी कॉलेजकडून सकारात्मक वातावरण निर्माण केले जाते.

या महत्त्वपूर्ण उपक्रमाला कॉलेज प्रशासनाकडून उत्स्फूर्त सहकार्य लाभले. लायन्स क्लब दापोलीच्या महिला सदस्यांनी या कार्यक्रमात विशेष पुढाकार घेत नियोजन, विद्यार्थिनींशी संवाद, मार्गदर्शन आणि सॅनिटरी नॅपकिन वाटपात सक्रिय सहभाग नोंदविला. यावेळी अस्मिता मेहता, रेखा जैन, स्मिताली राजपुरे, नेहा मेहता आणि रीतू मेहता यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमादरम्यान माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्टच्या निशा सावंत यांनी विद्यार्थिनींना मासिक पाळीदरम्यान उद्भवणाऱ्या समस्या, वैयक्तिक स्वच्छता, योग्य आहार आणि आरोग्याची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच प्रोजेक्ट बालाच्या सॅनिटरी नॅपकिनचा वापर, स्वच्छता, धुणे, वाळवणे आणि पुनर्वापर करताना घ्यावयाच्या काळजीची माहिती दिली. या कार्यक्रमास माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्टचे सहसंस्थापक देसाई आणि निशा सावंत उपस्थित होते.

तसेच लायन्स क्लब दापोलीचे अध्यक्ष गुरुप्रसाद बेर्डे, खजिनदार फजल रखांगे, आशिष मेहता आणि महेंद्र जैन उपस्थित होते. महिला आरोग्याला प्राधान्य देणे ही केवळ एका संस्थेची नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी असल्याचे मत यावेळी अध्यक्ष गुरुप्रसाद बेर्डे यांनी व्यक्त केले असून, भविष्यातही अशा प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.