मुंबई : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबद्दल महायुतीत अदयापही चर्चा सुरूच आहे. या मतदारसंघात नेमका कोणता चिन्ह असावा याबाबत एकमत होत नाहीये.

उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. ते उभे राहिले तर शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढतील. नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन किरण सामंत यांनी त्यांच्याबरोबर अर्धा तास चर्चा केली. रात्रीच ते रत्नागिरीकडे रवाना झाले आहेत.

आता दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते अधिकृत उमेदवारी कधी जाहीर करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

आपली तयारी पूर्ण झाली असून, पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तो आपल्याला मान्य असेल, असे सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ हा भाजप तसेच शिवसेनेने प्रतिष्ठेचा केला आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे; मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता परिस्थिती बदलली आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार विनायक राऊत यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे; मात्र भाजपलाही हा मतदारसंघ आता हवा आहे. भाजपने तिथून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उतरविण्याची तयारी पूर्ण केली आहे.

दुसऱ्या बाजूला उद्योग मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत देखील इथून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.

*सामंत यांचे फडणवीस यांच्याशी जुने संबंध*

उद्योग मंत्री उदय सामंत यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुने स्नेहाचे संबंध आहेत. उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात शनिवारी या मतदारसंघाबाबत चर्चाही झाली आहे.

देवेंद्र फडणवीस हे रविवारी नागपूर येथे होते. त्यांनी किरण सामंत यांना चर्चा करण्यासाठी नागपूरला बोलाविले. किरण सामंत यांनी रविवारी थेट नागपूर गाठले. आपली या मतदारसंघातून लढण्याची तयारी पूर्ण झाली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण चर्चा करू. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी बाजू ऐकून घेतली.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तो आपल्याला मान्य असेल, असेही किरण सामंत यांनी स्पष्ट केले आहे.