रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी होते इच्छुक

रत्नागिरी – रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू व सिंधूरत्न योजनेचे सदस्य किरण सामंत हे इच्छुक होते, मात्र मंगळवारी रात्री उशिरा त्यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी व अब की बार ४०० पार करण्यासाठी आपण लोकसभा निवडणुकीतून माघार घेत आहोत, आपण निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती किरण उर्फ भैय्या सामंत यांनी सोशल मीडियावरून दिली आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून शिवसेना शिंदे गट व भाजप यांच्यामध्ये चढाओढ सुरू होती. सिंधूरत्न योजनेचे सदस्य किरण सामंत हे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून इच्छुक होते.

किरण सामंत यांनी निवडणूक लढवण्याची तयारीही केली होती. प्रचाराची पहिली फेरीही पूर्ण केली होती. मात्र अचानक मंगळवारी रात्री आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी माघार घेत आहोत, अशी त्यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

किरण सामंत यांच्या या पोस्टमुळे ही जागा भाजपला सोडली गेली आहे, हे स्पष्ट झाले आहे. तसेच येथून माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे निवडणूक लढवतील, हेही असेही स्पष्ट झाले आहे.