रत्नागिरी – चिपळूण तालुक्यातील पिंपळी नंदिवसे येथील प्रजिमा २३ साखळी क्रमांक १/०० खडपोली पूल आज रात्री १०:३० वाजता कोसळला.
सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली आहे.
अलोरे पोलीस ठाणे हद्दीतील पेंडाबे ते खडपोली या पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे.
हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) हस्तांतरित केला होता. यापूर्वी, ५ जुलै २०२५ रोजी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी चिपळूण येथील ‘सहकार भवन’मध्ये खडपोली आणि खेर्डी एमआयडीसी परिसरातील नागरिकांच्या समस्यांबाबत, विशेषतः पुलांच्या बांधकामासंदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीत रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी २७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.
पावसाळ्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करून पावसाळ्यानंतर काम सुरू व्हावे, तसेच खडपोली आणि खेर्डी एमआयडीसीशी संबंधित समस्या मार्गी लावाव्यात, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री सामंत यांनी यावेळी दिल्या होत्या. सध्या पर्यायी मार्गाने वाहतूक सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.