दापोली: तालुक्यातील कर्दे गावचे सरपंच व प्रगतशील शेतकरी सचिन तोडणकर यांची दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी विस्तार शिक्षण विभागाच्या अभ्यास मंडळावर (बोर्ड ऑफ स्टडीज) निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दापोली तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या तोडणकर यांच्या या निवडीमुळे परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे यांनी ही निवड जाहीर केली असून पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कृषी क्षेत्रातील अनुभव, शेतकऱ्यांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क तसेच ग्रामीण भागातील शेतीविषयक प्रश्नांवर त्यांनी केलेले कार्य लक्षात घेऊन ही निवड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
कृषी विस्तार शिक्षण विभागाच्या अभ्यास मंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या अडचणी, बदलते शेती तंत्रज्ञान, संशोधनात्मक उपक्रम तसेच ग्रामीण भागातील कृषी विकासासाठी आवश्यक उपाययोजना यावर चर्चा होणार आहे.
या मंडळावर सदस्य म्हणून सचिन तोडणकर यांच्यावर शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्यावरील संशोधनात्मक व व्यावहारिक सूचना मांडण्याची जबाबदारी राहणार आहे.
सचिन तोडणकर हे प्रगतशील शेतकरी म्हणून परिसरात परिचित असून विविध कृषी उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांच्या निवडीमुळे दापोली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना विद्यापीठ स्तरावर अधिक प्रभावीपणे मांडणी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या निवडीबद्दल सामाजिक, राजकीय तसेच कृषी क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

