रत्नागिरी : कोकणाच्या सांस्कृतिक वैभवाला उजाळा देणारी ‘कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धा’ आणि तिचे आयोजक कांचन मालगुंडकर यांच्या निःस्वार्थ कार्याचे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तोंडभरून कौतुक केले.
काल जयेश मंगल कार्यालयात पार पडलेल्या दिमाखदार पारितोषिक वितरण सोहळ्यात सामंत यांनी सांगितले की, स्वतःच्या ताकदीवर अशी भव्य स्पर्धा आयोजित करणे हे खडतर कार्य आहे.
रत्नागिरीतील युवा पिढी गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणाचे संस्कार जपण्याचा प्रयत्न करते. या संस्कारांना आणि कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी कांचन यांनी सजावट स्पर्धा आणि बालमूर्तीकारांसाठी गणेशमूर्ती घडविण्याची स्पर्धा आयोजित करून एक आदर्श घालून दिला आहे.

“कांचन यांचे हे निःस्वार्थ कार्य कौतुकास पात्र आहे. त्यांनी कधीही या लोकप्रियतेचा राजकीय फायदा उचलण्याचा विचार केला नाही, हे त्यांच्या सच्चेपणाचे द्योतक आहे,” असे सामंत यांनी ठासून सांगितले. भविष्यातही अशा सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांसाठी आपण कांचन यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या सोहळ्यात भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे आणि कांचन मालगुंडकर यांच्या हस्ते मंत्री उदय सामंत यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. दिग्गज अभिनेता वैभव मांगले, अभिनेता पंढरीनाथ कांबळे (पॅडी), आणि अभिनेत्री वीणा जामकर यांनी सोहळ्याला खास हजेरी लावली.

पॅडी कांबळे यांनीही कांचन यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. यावेळी सर्व विजेते, परीक्षक आणि मान्यवरांना मंत्री सामंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
‘कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धा २०२५’मध्ये प्रथम क्रमांक आशिष वाडकर (१५,००० रुपये, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र – श्री देव भैरी मंदिर देखावा, लक्ष्मीकांतवाडी, मिरजोळे), द्वितीय क्रमांक राहुल पाडावे आणि एकता परिवार (१०,००० रुपये, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र – संत एकनाथ महाराज देखावा, मिरजोळे), तृतीय क्रमांक संतोष कुड (६,००० रुपये, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र – रेड्यामुखी वेद, संत ज्ञानेश्वर देखावा, पड्यारवाडी, गावखडी) यांनी पटकावला. सुबक गणेशमूर्तींसाठी साईराज वाडकर (लक्ष्मीकांतवाडी, मिरजोळे) आणि वामन सुवारे (फगरवठार, साळवी बंधू देखावा) यांचा विशेष गौरव झाला. याशिवाय उल्लेखनीय, उत्तेजनार्थ आणि प्रोत्साहनपर पारितोषिक विजेत्यांचाही सन्मान करण्यात आला.

सोहळ्यात महिला मंडळाने सादर केलेल्या मंगळागौरीने उपस्थितांची मने जिंकली. मुन्ना सुर्वे, प्रसन्न आंबुलकर, प्रवीण जैन, मुकेश गुंदेजा, राजू घाग, रक्षा घाग, वैभवी खेडेकर, सुदेश मयेकर, गौरान आगाशे, बाबू माप, विजय खेडेकर, गणेश धुरी आणि इतर मान्यवरांसह स्पर्धक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नव्या नियमाची घोषणा
कांचन यांनी यावेळी स्पर्धेसाठी नवा नियम जाहीर केला. दरवर्षी काही विजेते सातत्याने प्रथम क्रमांक पटकावतात, ज्यामुळे इतरांना संधी मिळण्यात अडथळा येतो. यासाठी पुढील वर्षांपासून प्रथम क्रमांकाचा विजेता पुढील दोन वर्षे स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. यामुळे इतरांना प्रथम क्रमांक मिळवण्याची संधी मिळेल, असे कांचन यांनी सांगितले.