दापोली : जेसीआय या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या जेसीआय भारत यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जैतरा २०२३ हा समाजपयोगी सप्ताह जेसीआय दापोली या संस्थेमार्फत दापोली मध्ये विविध उपक्रमांच्याद्वारे उत्साहात संपन्न झाला.

दिनांक ९ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर यादरम्यान या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते, प्रत्येक दिवशी नाविन्यपूर्ण व समाजपयोगी उपक्रमांनी या सप्ताहाचे आयोजन केले होते.

यामध्ये दापोली आगार येथे कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये रक्त तपासणी, डोळे तपासणी, दंत तपासणी इत्यादी तपासण्या मोफत करण्यात आल्या यामध्ये १५७ कर्मचाऱ्यांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.

या सप्ताह दरम्यान जेसीआय दापोली व संतोष अबगुल प्रतिष्ठान यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तब्बल १६१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केले.

तसेच दापोली पोलीस ठाणे येथे पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या दृष्टिकोनातून वॉटर प्युरिफायर प्रदान करण्यात आले. तसेच पाणी संवर्धन संदर्भात दापोली शहरांमध्ये शाळा, महाविद्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालये, खाजगी कार्यालये व सार्वजनिक ठिकाणी स्टिकर्स लाऊन जनजागृती करण्यात आली.

त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे रुग्णांच्या नातेवाईकांसाठी बसण्यासाठी विसावा वाटिका याचे सुशोभीकरण करण्यात आले.

तसेच एन. के. वराडकर महाविद्यालय येथे तंबाखूसेवन विरोधात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये जेसीआय दापोलीचे अध्यक्ष डॉ. सुयोग भागवत यांनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले.

त्याचप्रमाणे दान या उपक्रमाअंतर्गत जेसीआय दापोलीच्या वतीने सागरपुत्र आश्रम शाळा, सावित्रीबाई फुले वसतिगृह व बहु विकलांग विद्यार्थ्यांचे आनंद फाउंडेशन येथे गृहपयोगी वस्तू देण्यात आल्या.

त्याचबरोबर क्लीन प्लेट चॅलेंज या संदर्भामध्ये स्टिकर्स लावून विविध ठिकाणी जनजागृती देखील करण्यात आली, तर ३५० हून अधिक विद्यार्थ्यांनी अन्न वाया जाऊ देणार नाही यासंदर्भामध्ये शपथ देखील घेतली गेली.

जेसीआय दापोली या संस्थेच्या सभासदांमध्ये व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन तसेच आपापल्या व्यवसायासंदर्भामध्ये इतर सभासदांना माहिती देऊन आपल्या व्यवसाय वाढीसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळे दरम्यान जेसीआय दापोलीच्या सभासदांनी आपापल्या व्यवसाय संदर्भात माहिती दिली.

आज पर्यंतच्या जेसीआय दापोलीच्या माजी अध्यक्षांचा सपत्नीक सन्मान देखील या सप्ताहा दरम्यान करण्यात आला. तसेच गव्हे येथील अरविंद अमृते व शैला अमृते यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

समाजामध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करत असलेले पण ज्यांचा नाम उल्लेख किंवा सन्मान होत नाही अशा व्यक्तींचा सॅल्यूट द सायलेंट वर्कर या विशेष उक्तीखाली जेसीआय दापोलीच्या वतीने सन्मान करण्यात आला.

अखेरच्या दिवशी पर्यावरण पूरक, आरोग्याचा व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जेसीआय दापोली व दापोली सायकलिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शहरांमध्ये सायकल रॅली काढून या सप्ताहाचा समारोप करण्यात आला.

या सप्ताह दरम्यान जैसे दापोलीचे अध्यक्ष जेसी डॉ. सुयोग भागवत, सचिव फराज रखांगे यांच्यासह जेसीआय दापोलीच्या सर्वच सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.