इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेता आता भारतानेही कंबर कसली आहे. लवकरच भारत इलेक्ट्रिक गाड्यांच्या उत्पादनासाठी महत्वाचं केंद्र बनू शकतं. जपानमधील सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने गुजरातमध्ये १.२६ बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. या गुंतवणुकीच्या आधारे गाड्या तसंच बॅटरींच्या निर्मितीसीठी फॅक्टरी उभारली जाईल. जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा शनिवारी भारत भेटीवर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर त्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने गुजरात सरकारसोबत करार केला असून यानुसार, इलेक्ट्रिक वाहनांचं उत्पादन वाढवण्यासाठी तसंच बॅटरी निर्मिती प्रकल्प आणि वाहन पुनर्वापर युनिटचे बांधकाम यासाठी १.२६ बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्या भारत भेटीदरम्यान या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित होते.

जपानची भारतात ४२०० कोटी डॉलर गुंतवणूक; किशिदा- मोदी शिखर बैठकीत युक्रेनचाही मुद्दा
जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात शनिवारी दिल्लीत भारत-जपान चौदाव्या शिखर परिषदेत उभय बाजूंचे आर्थिक- सांस्कृतिक संबंध दृढ करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर जपानकडून भारतात पुढील पाच वर्षांत ४२०० कोटी डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा करण्यात आली. उभय देशांदरम्यान सायबर सुरक्षा आणि स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांसाठीच्या करारांवरही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. याचवेळी हा सामंजस्य करारदेखील करण्यात आला.