रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दलाने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी रत्नागिरी येथील तटरक्षक क्षेत्र (पश्चिम) मध्ये स्वदेशी बनावटीचे प्रगत हलके हेलिकॉप्टर ‘एएलएच एमके-३’ (तटरक्षक ८७५) समाविष्ट केले आहे.

कोस्ट गार्ड एअर स्टेशन, रत्नागिरी येथे या अत्याधुनिक विमानाचे पारंपारिक ‘वॉटर कॅनन सॅल्युट’ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी भारतीय तटरक्षक वायू अवस्थानच्या कमांडिंग ऑफिसरनी विमान आणि क्रू सदस्यांचे स्वागत केले.

रत्नागिरीत या हेलिकॉप्टरचा समावेश झाल्याने पश्चिम किनारपट्टीवरील तटरक्षक दलाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे. हे हेलिकॉप्टर प्रगत रडार, इलेक्ट्रो-ऑप्टिकल पॉड आणि ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टीमद्वारे लांब पल्ल्याच्या इमेजिंग क्षमतेने सुसज्ज आहे.

तसेच, लक्ष्याला निष्प्रभ करण्यासाठी विमानाच्या केबिनमध्ये १२.७ मिमी हेवी मशीन गन बसवण्यात आली आहे. या नव्या क्षमतेमुळे विशेषतः महाराष्ट्राच्या संवेदनशील किनारपट्टीवर आणि विशेष आर्थिक क्षेत्रात (ईईझेड) सागरी हितसंबंधांचे रक्षण करणे अधिक सुलभ होणार आहे.

रत्नागिरी येथील ८३१ स्क्वॉड्रनमध्ये तैनात करण्यात येणाऱ्या पाच विमानांपैकी हे पहिले विमान आहे. उर्वरित विमानांच्या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या समावेशामुळे या विस्तीर्ण सागरी क्षेत्रात सतत हवाई पाळत ठेवणे आणि आव्हानांना जलद प्रतिसाद देणे शक्य होईल.

भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानांतर्गत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) सोबतच्या नवीन करारातील एकूण नऊ विमानांपैकी हे पाचवे विमान आहे.

या प्रगत हेलिकॉप्टरमुळे तटरक्षक दलाची शोध आणि बचाव कार्ये, प्रदूषण नियंत्रण आणि सागरी सुरक्षेची क्षमता अधिक बळकट झाली असून, आयसीजीएएस रत्नागिरीच्या कार्यक्षमतेत एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.