रत्नागिरी (राजापूर): राजापूर तालुक्यातील कोदवली पहिला बस स्टॉप फाटा येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत तेरा लाख पन्नास हजार रुपयांहून अधिक किमतीचा गोवा बनावटीचा अवैध दारूसाठा आणि दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत.
या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात कणकवलीतील तिघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल लक्ष्मण चिंदरकर (वय ३५), अमित धोंडू चिंदरकर (वय ३४) आणि प्रशांत प्रकाश पवार (वय २९, सर्व रा. कलमठ, गावडेवाडी, ता. कणकवली) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ मे २०२६ रोजी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास कोदवली पहिला बस स्टॉप फाटा येथे ही धडक कारवाई करण्यात आली.
सदर आरोपी हे बोलेरो पीकअप (एम.एच. ०७ ए.जे. ५०७५) आणि इनोव्हा कार (एम.एच. ४३ व्ही. २८२९) या दोन गाड्यांमधून विक्री करण्याच्या उद्देशाने विनापरवाना गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करत असताना पोलिसांना मिळून आले.
या कारवाईत पोलिसांनी विविध ब्रँडच्या दारूच्या बाटल्या आणि दोन वाहने असा एकूण १३ लाख ५० हजार २५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जप्त केलेल्या दारूमध्ये गोल्डन एस ब्लू व्हिस्की, हेवर्ड्स फाईन व्हिस्की, मॅकडॉवेल नंबर १ आणि ओकस्मिथ या ब्रँडच्या हजारो सीलबंद बाटल्यांचा समावेश असून या दारूची एकूण किंमत ३ लाख ५० हजार २५६ रुपये इतकी आहे.
यासोबतच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या प्रत्येकी पाच लाख रुपये किमतीच्या बोलेरो आणि इनोव्हा या दोन गाड्याही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अनिल लक्ष्मण केसकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजापूर पोलीस ठाण्यात २४ मे रोजी मध्यरात्री आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (अ), (ई) नुसार रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचा पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.

