दापोली : तालुक्यातील माथेगुजर येथे अचानक आलेल्या वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे एका गोठ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

माथेगुजर येथील रहिवासी मोहन संभाजी पवार यांच्या मालकीच्या गोठ्याला या नैसर्गिक संकटाचा मोठा फटका बसला असून गोठ्यावरील तब्बल २७ पत्रे जोरदार वाऱ्यामुळे तुटून उडून गेले आहेत.

या घटनेमुळे मोहन संभाजी पवार यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की गोठ्याचे छप्पर मोठ्या प्रमाणावर उध्वस्त झाले, मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

गोठ्यातील जनावरे आणि परिसरातील नागरिक सुरक्षित असल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या नुकसानीची महसूल प्रशासनाकडून लवकरात लवकर दखल घेऊन घटनेचा पंचनामा करण्यात यावा, जेणेकरून नुकसानग्रस्ताला योग्य ती सरकारी मदत मिळू शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.