दापोली : तालुक्यातील आंजर्ले येथे आज झालेल्या मुसळधार पावसामुळे कोपरी भागातील शिंत्रे यांच्या घरासमोरील रस्त्यालगत असलेले एक मोठे आंब्याचे झाड अचानक उन्मळून पडले.
हे झाड शिंत्रे यांच्या पडक्या वाड्यावर आणि शेजारीच राहणारे रवी खंडकर यांच्या घरावर कोसळले. या दुर्घटनेत खंडकर यांच्या घराचे अंदाजे ५० ते ६० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

सुदैवाने, रवी खंडकर हे सध्या मुंबई येथे वास्तव्यास असल्याने अपघाताच्या वेळी घरात कोणीही नव्हते, ज्यामुळे एक मोठी जीवितहानी टळली आहे.
या घटनेची माहिती मिळताच आंजर्ले पोलीस पाटील जगदीश कळमकर, प्रशासक मेघना पवार, उदय बापट, मंगेश महाडीक, मकरंद म्हादलेकर, दत्ता जोशी, बाळ केळकर आणि दिगंबर निजसुरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.
यानंतर त्यांनी या घटनेची सविस्तर माहिती तलाठी पाटील यांना दिली असून पुढील आवश्यक ती प्रशासकीय कारवाई सुरू करण्यात आली आहे.

