Dapoli : आगामी काळातील संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि पाण्याचा साठा वाढविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन बंधारे विशेष अभियाना’त दापोली तालुक्यातील हनुमानवाडी येथील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार १५ ऑक्टोबर रोजी प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात किमान २० बंधारे बांधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याच अभियानांतर्गत ग्रुपग्रामपंचायत दमामे-तामोंड यांच्या पुढाकाराने गावात बंधारे बांधण्याची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत हनुमानवाडी येथील नवतरुण हनुमान मित्र मंडळ आणि महालक्ष्मी महिला मंडळ यांनी सक्रिय सहभाग घेतला.

गावातील तरुण, महिला आणि ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून बंधारे बांधण्याचे काम केले. आवश्यक साहित्याची जमवाजमव करून सर्वांनी या कामात योगदान दिले.

ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आणि सामूहिक प्रयत्नांमुळे या जलसंधारणाच्या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे, भूजलपातळी वाढवणे आणि भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी हे बंधारे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

या उपक्रमावेळी ग्रुपग्रामपंचायत दमामे-तामोंडच्या सरपंच अर्पिता शिगवण, उपसरपंच गंगाराम हरवडे, नवतरुण हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश धोंडू हरवडे तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांची एकजूट आणि श्रमदान हीच खरी ताकद असल्याचे हनुमानवाडीतील ग्रामस्थांनी या उपक्रमातून दाखवून दिले असून, या सामाजिक कार्यात सहभागी झालेल्या सर्वांचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.