
दापोली : जालगाव कुंभारवाडी येथे १ आणि २ एप्रिल २०२६ रोजी हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन आणि हनुमान रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या निमित्ताने मारुती मंदिर आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते.

उत्सवाच्या पहिल्या दिवशी मंदिरात सकाळी सत्यनारायणाची महापूजा, सायंकाळी महाआरती आणि कुंभारवाडी ग्रामस्थ मंडळाचे संगीत भजन झाले.
दुसऱ्या दिवशी तन्वी गुरव यांचे जन्मकाळाचे कीर्तन झाले. त्यानंतर संगीत भजन, पारंपरिक खालू बाजा आणि ढोल-ताशांच्या गजरात हनुमंताची रथ मिरवणूक जालगाव बाजारपेठ आणि वाडीमध्ये काढण्यात आली. सायंकाळी पुन्हा महाआरती आणि भजनाचा कार्यक्रम झाला.
यंदा विकास युवक मंडळाचा ३५ वा वर्धापन दिन असल्याने मंडळाकडून विशेष कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. या उत्सवात ग्रामस्थ मंडळ, प्रगती महिला मंडळ, मुंबई मंडळ आणि विकास युवक मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कुंभारवाडीचे अध्यक्ष संतोष वायकर यांनी माहिती दिली की, येथील हनुमंताची मूर्ती स्वयंभू असून हा उत्सव पारंपरिक पद्धतीने पिढ्यानपिढ्या चालत आला आहे.
१८५० मध्ये वेदक फाटक यांनी हनुमंताला चांदीचा मुखवटा अर्पण केला होता, त्याही पूर्वीपासून हा सोहळा साजरा केला जात आहे. भविष्यातही तरुण पिढी हा वारसा अशीच पुढे चालवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply