रत्नागिरी पत्रकार भवनाचे भूमिपूजन

रत्नागिरी: मिरजोळे एमआयडीसी येथे पत्रकार भवन इमारतीचे भूमिपूजन उदय सामंत यांच्या हस्ते झाले. या भवनात ग्रंथालय, अभ्यासिका आणि निवासाची सोय असेल.

याठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करून पत्रकारांनी आयएएस, आयपीएस अधिकारी घडवण्यास मदत करावी, असा संदेश महाराष्ट्रभर जावा, अशी अपेक्षा सामंत यांनी व्यक्त केली. या केंद्रासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

१ कोटी ३६ लाख रुपये खर्चून ही इमारत उभी केली जात आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री असताना एलफिन्स्टन कॉलेजला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे तैलचित्र लावण्याची संधी मिळाली, तसेच या भवनासाठी जमीन उपलब्ध करून देता आली, याचे समाधान सामंत यांनी व्यक्त केले.

सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे सध्या आत्मचिंतनाची गरज असून पत्रकारितेत आचारसंहितेची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

रत्नागिरीतील मुख्य ठिकाणच्या जागेचा प्रश्न पत्रकारांनी एकत्रितपणे सोडविल्यास, त्या जागेसाठी ५ कोटी रुपये देऊन राज्यातले अद्ययावत पत्रकार भवन तिथे उभारले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. एक वर्षाच्या आत हे काम पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी वैदेही रानडे, प्रशांत सातपुते, जीवन देसाई, वंदना खरमाळे यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे, सतीश कामत, किशोर मोरे, हेमंत वणजू, आनंद तापेकर, जान्हवी पाटील, प्रमोद कोनकर आणि जिल्ह्यातील इतर पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत सातपुते यांनी केले, तर आभार अलिमियाँ काझी यांनी मानले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*