रत्नागिरी : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य आणि जागतिक स्तरावरील स्मारक उभारण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील वास्तुरचनाकारांची (आर्किटेक्ट) नियुक्ती केली जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.
पालकमंत्री डॉ. सामंत यांनी आज कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठी सरदेसाई वाडा आणि परिसराची पाहणी केली.
या वेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, जागेचे मालक सुभाष सरदेसाई, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले,
पालकमंत्री ना. उदय सामंत
“सरदेसाई यांनी स्मारक उभारण्यासाठी जमीन देण्याची सकारात्मक भूमिका घेतली आहे. स्मारक लवकरात लवकर व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. २९ मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत. स्मारकासाठी कितीही खर्च आला तरी शासन तो करण्यास तयार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान पुढच्या पिढीला समजावे, अशा प्रकारे स्मारक उभारण्यात येणार आहे. लवकरच स्मारकाचा आराखडा तयार करून काम सुरू केले जाईल. पुढील ९० दिवसांत निविदा काढण्यास हरकत नाही.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महत्त्वाचे सहकार्य मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या वेळी जागेचे मालक सुभाष सरदेसाई यांनी पालकमंत्री डॉ. सामंत यांना जागेची माहिती दिली आणि त्या जागेचा इतिहास सांगितला.