राजापूर : ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक स्तरावर चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि गरजू रुग्णांना वेळेवर मदत मिळावी, या उद्देशाने फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्यांचे सीएसआर भागीदार मुकुल माधव फाउंडेशन यांच्या वतीने राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील कर्तव्य प्रतिष्ठान या संस्थेला विविध वैद्यकीय उपकरणे प्रदान करण्यात आली आहेत.

या उपक्रमांतर्गत फोल्डिंग बेड, व्हीलचेअर, कमोड चेअर, शवपेटी, स्ट्रेचर आणि इतर आवश्यक वैद्यकीय साहित्याचे वाटप करण्यात आले असून, याचा थेट लाभ आडिवरे व पंचक्रोशीतील गरजू नागरिकांना होणार आहे.

ग्रामीण भागात अनेकदा अद्ययावत वैद्यकीय उपकरणांच्या अभावामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होते. अशा परिस्थितीत कर्तव्य प्रतिष्ठानला उपलब्ध करून दिलेल्या या उपकरणांमुळे रुग्णांना गावातच प्राथमिक आणि आवश्यक सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. या साहित्यामुळे रुग्णांची ने-आण करणे, त्यांची योग्य काळजी घेणे आणि गरजू कुटुंबांना वेळेवर वैद्यकीय मदत पुरवणे अधिक सुलभ होईल.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या या सामाजिक बांधिलकीतून राबवलेल्या उपक्रमामुळे ग्रामीण आरोग्यसेवा अधिक सक्षम होण्यास मदत मिळेल आणि यातून स्थानिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.