राज्यातील गड-किल्ल्यांच्या जतन व संवर्धनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली २३ सदस्यांच्या सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात शिवनेरी, राजगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुधागड आणि तोरणा या ६ किल्ल्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे.
या संदर्भात राज्य शासनाच्यावतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात सांगण्यात आले आहे की, मुख्यमंत्र्यांनी दुर्गप्रेमी प्रतिनिधींसमवेत एक बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गड-किल्ल्यांचे पावित्र्य जपत, ऐतिहासिक वारशाला धक्का न लावता, गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धन करणे, तसेच किल्ल्यासभोवतालच्या परिसरात पर्यटकांसाठी सुविधा पुरविणे,कामांच्या प्रगतिचा आढावा घेण्यासाठी एक सुकाणू समिती गठीत करण्याचे तसेच कामकाजाचे संनियंत्रण मुख्यमंत्री सचिवालयातील संकल्प कक्षातून करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या पार्श्वभूमीवर आता, गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धनाच्या कामाचा तसेच त्या परिसरातील पर्यटनासाठी सुविधा निर्माण करणे व त्या परिसराचे जैवविविधता जतन व वनीकरण करणे या कामांचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी सुकाणू समितीचे गठण करण्यात आले आहे. याचबरोबर जैवविविधता जपण्याच्या सूचना दिल्या.