दापोली: येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांना संरक्षण मंत्रालयाने कर्नल कमांडंट ही मानद उपाधी जाहीर केली आहे.

भारत सरकारच्या राजपत्रात ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

डॉ. संजय भावे यांनी आपले शिक्षण कोकण कृषी विद्यापीठातूनच पूर्ण केले असून, शिक्षण घेत असताना ते राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) तीन वर्षे कॅडेट होते.

तसेच, १९७९ ते १९८२ या काळात त्यांनी सिनिअर अंडर ऑफिसर म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.

विद्यापीठाच्या सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांनी सात वर्षे सहयोगी राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी म्हणूनही कार्य केले आहे.

या त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत संरक्षण मंत्रालयाने त्यांना ही प्रतिष्ठित उपाधी बहाल केली आहे.

एप्रिल महिन्यात मुंबई येथील एनसीसीचे अतिरिक्त महासंचालक, कोल्हापूर येथील ब्रिगेडिअर आणि बटालियन कर्नल यांच्या उपस्थितीत आयोजित एका विशेष कार्यक्रमात कुलगुरू डॉ. संजय भावे यांना ही मानद उपाधी औपचारिकरीत्या प्रदान करण्यात येणार आहे.

या उपाधीने सन्मानित होणारे डॉ. संजय भावे हे कोकण कृषी विद्यापीठाचे चौथे कुलगुरू ठरले आहेत. यापूर्वी डॉ. शंकरराव मगर, डॉ. विजय मेहता आणि डॉ. संजय सावंत यांनाही ही उपाधी मिळाली होती.

संरक्षण मंत्रालयाने देशभरातील १३ विद्यापीठांच्या कुलगुरूंना ही मानद उपाधी जाहीर केली आहे. यापैकी केवळ दोन कुलगुरू महाराष्ट्रातील आहेत.

यात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे डॉ. संजय भावे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांचा समावेश आहे.

या सन्मानामुळे कोकण कृषी विद्यापीठाचा गौरव वाढला असून, डॉ. भावे यांच्या कार्याचा ठसा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.