दापोली आणि मंडणगड परिसरातील हजारो नागरिक कामानिमित्त विरार आणि आसपासच्या परिसरात वास्तव्यास असून, त्यांच्या सोयीसाठी विरार ते दापोली दरम्यान थेट एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
यासंदर्भात अमोल तुकाराम काते यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री तथा दापोलीचे आमदार योगेश कदम यांना निवेदन दिले आहे. गणेशोत्सव, शिमगा यांसारखे सण, उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि कौटुंबिक कामांसाठी गावी जाताना थेट बससेवा नसल्याने प्रवाशांचे आणि विशेषतः आबालवृद्धांचे मोठे हाल होतात.
सध्या प्रवाशांना नालासोपारा, बोरिवली किंवा मुंबई सेंट्रल येथे जाऊन एसटी बस पकडावी लागते. सणासुदीच्या काळात सामानासह गर्दीच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणे अत्यंत जिकिरीचे ठरते.
याशिवाय खाजगी ट्रॅव्हल्सचे तिकीट दर सर्वसामान्यांना न परवडणारे असल्याने प्रवाशांना आर्थिक शोषणालाही सामोरे जावे लागते. तसेच थेट एसटी सेवा नसल्याने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना शासनातर्फे देण्यात आलेल्या सवलतींचा लाभही घेता येत नाही.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विरार अर्नाळा आगार ते दापोली आणि दापोली ते विरार अशी थेट बससेवा बोरिवली-सायन-पनवेल आणि ठाणे-पनवेल या दोन्ही मार्गांनी सुरू करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
ही बससेवा सकाळ आणि रात्रीच्या वेळेत सुरू झाल्यास दापोलीसह मंडणगडवासीयांना मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि विभागीय नियंत्रकांशी चर्चा करून ही सेवा लवकरात लवकर सुरू करावी, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.

