दापोली पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल संतोष सडकर यांना शौर्य पदक जाहीर

रत्नागिरी: जिल्ह्यातील दापोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष सडकर यांना पोलीस दलातील उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल शौर्य पदक जाहीर झाले आहे. चिपळूण तालुक्यातील अलोरे गावचे सुपुत्र असलेल्या सडकर यांच्यावर या सन्मानानंतर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पोलीस दलात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येते. संतोष सडकर यांना त्यांच्या गुणवत्तापूर्ण सेवेकरिता पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. यापूर्वी त्यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात सेवा बजावली असून, सध्या ते दापोली पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी तपासलेल्या अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा झाली आहे. फरारी आरोपींना पकडण्यात त्यांचा हातखंडा आहे, तसेच अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

देवरूख पोलीस ठाण्यातही त्यांनी काही वर्षे सेवा बजावली आहे. शौर्य पदक जाहीर झाल्याने दापोली, देवरूख आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून त्यांचे कौतुक होत आहे. लवकरच एका खास समारंभात त्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*