दापोली : महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला ठेकेदाराकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं आज दापोली येथे रंगेहात पकडले आहे.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर असून त्यांना त्यांचे पक्षकार यांनी केलेल्या प्लॉटिंग वर बसवण्यात येणाऱ्या 110kV वीज भार व ट्रान्सफॉर्मर या कामाच्या इस्टिमेटची मंजुरी देवून तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर करण्याकरिता दापोली महावितरण कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता अमोल मनोहर विंचूरकर या आरोपी लोकसेवकानं तक्रारदार यांचेकडून 80000/- रुपयांची मागणी केली. मागणी केलेल्या रकमेपैकी 50,000/- रुपये लगेच स्वीकारण्याचे मान्य केले. हे 50,000/- रुपये अमोल विंचूरकर याने स्वीकारले असता आज गुरूवारी दुपारी 1:37 वाजता त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी 50,000/- रूपयांची रोख रक्कमही आरोपींकडून जप्त केली आहे. या विभागामार्फत आरोपीला अटक करून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.

या कारवाई पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर, पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनंत कांबळे, पोलीस हवालदार विशाल नलावडे, पोलीस शिपाई हेमंत पवार, प्रशांत कांबळे यांनी केली.

या घटनेतील तक्रारदार यांचे कुठलेही काम संबंधित कार्यालयात अडवले जाणार नाही याची शाश्वती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना दिली आहे. त्यांचे काम आम्ही तत्काळ करून घेत आहोत, असं देखील विभागामार्फत कळवण्यात आलं आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत नागरिकांना आवाहन

आपल्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने एखाद्या खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा परवानगी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ खालील फोन व मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन रत्नागिरीतीव सर्व नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलं आहे. त्याचबरोबर तक्रारदाराचं नाव गुप्त ठेवण्यात येईल, असंही विभागामार्फत सांगण्यात आलं आहे.
संपर्क –
१)लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
रत्नागिरी कार्यालय फोन नं. 02352- 222893
२) सुशांत चव्हाण, DYSP , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी मो.नं.9823233044
३) प्रविण ताटे, PI लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी मो. नं. 8055034343
4) अनंत कांबळे, PI लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी मो.न. 7507417072
३) टोल फ्री :- १०६४