दापोली (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना शाखा दापोली यांच्या वतीने ‘गुणवंत विद्यार्थी गौरव आणि शाळा व शिक्षक सन्मान सोहळा २०२५’ हा भव्य कार्यक्रम रविवारी, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता श्री मंगल कार्यालय, दापोली येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका नेते नितीन अर्जुन बांद्रे होते.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे, शिक्षण विस्तार अधिकारी सुधाकर गायकवाड, केंद्र प्रमुख संघटनेचे अध्यक्ष सुनिल कारखेले, जिल्हाध्यक्ष विश्वनाथ डवरी, जिल्हा उपाध्यक्ष विश्वास भोपे, जिल्हा महिला प्रतिनिधी विश्रांती शेळके फडतरे, तसेच प्रवीण काटकर, रमाकांत शिगवण, बळीराम राठोड यांच्यासह तालुक्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.

या सोहळ्यात दापोली तालुक्यातील विविध शाळांमधील चौथी, पाचवी शिष्यवृत्तीधारक, नवोदय विद्यालय प्रवेश पात्र विद्यार्थी, आठवी शिष्यवृत्तीधारक आणि RTS गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले. तसेच मार्गदर्शक शिक्षक आणि शाळांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षकांच्या हक्कांसह कर्तव्याची जाणीव ठेवत आधुनिक युगातील AI तंत्रज्ञानावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

तालुकाध्यक्ष भालचंद्र घुले यांनी प्रास्ताविकात शिक्षणातील गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि जुन्या पेन्शन हक्कासाठी संघटनेची भूमिका याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता मडीवाळ आणि गीता पाध्ये यांनी केले, तर सचिव स्वप्निल परकाळे यांनी आभार प्रदर्शन केले.

हा कार्यक्रम जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या कार्यकारिणीच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व सदस्यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला. यशस्वी आयोजनासाठी मान्यवर, पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.