रत्नागिरी : जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील कालुस्ते गावचे सुपुत्र झुल्फिकार परकार यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) २०२६-२७ या आगामी क्रिकेट हंगामासाठी १९ वर्षांखालील मुलांच्या निवड समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
या महत्त्वपूर्ण नियुक्तीमुळे संपूर्ण कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
भारतातील अग्रगण्य आणि प्रतिष्ठेच्या क्रिकेट संघटनांपैकी एक असलेल्या एमसीएने नुकतीच पाच सदस्यीय निवड समिती जाहीर केली असून, मुंबई क्रिकेटमधील परकार यांचे दीर्घकालीन क्रीडा योगदान, दांडगा अनुभव आणि निष्ठेची दखल घेत असोसिएशनने त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे.
विविध राष्ट्रीय व देशांतर्गत स्पर्धांमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वोत्तम, होतकरू आणि गुणवान १९ वर्षांखालील युवा क्रिकेटपटूंचा शोध घेऊन त्यांची निवड करण्याचे महत्त्वाचे दायित्व या समितीकडे असणार आहे.
मुंबईच्या क्रिकेट परंपरेला साजेसा नवा खेळाडू संच तयार करणे आणि मैदानावरील गुणवत्तेला योग्य व्यासपीठ मिळवून देत या उदयोन्मुख खेळाडूंना क्रिकेटच्या सर्वोच्च स्तरापर्यंत पोहोचवण्यात ही निवड समिती निर्णायक भूमिका बजावणार आहे.
स्थानिक मातीतील क्रीडा व्यक्तिमत्त्वाला मुंबई क्रिकेटच्या मुख्य प्रवाहात मानाचे स्थान मिळाल्याने कालुस्ते गावासह चिपळूण तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींमधून झुल्फिकार परकार यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

