दापोली : हर्णे ते आंजर्ले बायपास रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात दुचाकी चालकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी दापोली पोलिसांनी आयशर टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी एका संबंधित महिला फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी चालक गंगाराम रामू माने (वय ५५, रा. नवानगर, ता. दापोली, जि. रत्नागिरी) याच्यावर गुन्हा नोंदवला आहे.

६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजण्याच्या सुमारास हर्णे ते आंजर्ले बायपास रोडवर हॉटेल रेंझींटाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पुढे सुमारे १०० मीटर अंतरावर हा अपघात घडला होता.

यामध्ये बासीद अल्ली दरबार बरमारे (वय ३२, रा. आडे वरचा मोहल्ला, ता. दापोली) या तरुणाचा मृत्यू झाला होता.

आंजर्ले बाजूकडून येणाऱ्या आयशर टेम्पो (क्रमांक एम.एच. ०८ डब्ल्यु ९०१३) वरील चालकाने आपले वाहन भरधाव वेगात, हलगर्जीपणाने आणि अविचाराने चालवून हर्णेकडून आंजर्लेकडे जाणाऱ्या सुझुकी ॲक्सेस दुचाकीला (क्रमांक एम.एच. ०८ ए.व्ही. ४७१४) जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेत दुचाकी चालक बासीद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, तसेच दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

या घटनेनंतर संबंधित महिला फिर्यादीच्या तक्रारीवरून दापोली पोलिसांनी ७ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री ००.१३ वाजता आरोपी गंगाराम माने याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १०६ (१), १२५ (ब), २८१ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा (गु.र.नं. १३३/२०२६) दाखल केला असून पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.