पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या सूचना
रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व मुली आणि महिलांना कर्करोग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एचपीव्ही लस देण्यासाठी तालुका स्तरावर शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी आठ दिवसांच्या आत रूपरेषा तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज जिल्हा शल्यचिकित्सक आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज या संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉ. समिधा गोरे, मुख्याधिकारी तुषार बाबर आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले की, तालुकास्तरीय शिबिरांचे आयोजन करताना प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांची मदत घ्यावी. त्यामुळे ९ ते १४ वयोगटातील विद्यार्थिनींची नेमकी संख्या मिळू शकेल. यासोबतच, या शिबिरांच्या माध्यमातून महिलांची संख्याही निश्चित करता येईल.
त्यांनी सांगितले की, ९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी लसीचे दोन डोस आणि १५ वर्षांवरील महिलांसाठी तीन डोस देण्यात येतात.
यावेळी पालकमंत्री डॉ. सामंत यांनी नगरपरिषदेला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी डायलिसिस युनिट सुरू करण्यासाठी सुस्थितीतील गाळे उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.
तसेच, त्यांना आवश्यक असणारी पाण्याची सुविधा पुरविण्याची सूचनाही त्यांनी केली. जिल्हा शल्य चिकित्सक आणि अधिष्ठाता यांनी रुग्णांसाठी चांगली रुग्णवाहिका उपलब्ध करावी, असेही ते म्हणाले.
जिल्ह्यासाठी मॅमोग्राफी व्हॅन खरेदी
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांना ठाणे महानगरपालिकेच्या धर्तीवर जिल्ह्यासाठी मॅमोग्राफी व्हॅन खरेदी करण्याची सूचना दिली.
यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यांनी सांगितले की, यासाठी अडीच कोटी रुपयांची औषधे आणि दोन कोटी रुपयांमधून व्हॅन खरेदी करावी. मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आणि डॉ. गोरे यांनी याबाबत एकत्रितपणे प्रस्ताव तयार करावा.
याव्यतिरिक्त, सिंधुरत्न योजनेतून आरोग्यासाठीही मदत मिळवण्याबाबत शासनाकडे शिफारस करावी, असेही डॉ. सामंत यांनी सांगितले.